समाजकल्याण कार्यालयाला टाळे
By Admin | Updated: April 29, 2016 23:56 IST2016-04-29T23:48:36+5:302016-04-29T23:56:24+5:30
औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या खोकडपुरा येथील विभागीय कार्यालयाला शुक्रवारी दुपारी काही कार्यकर्त्यांनी कुुलूप ठोकले. यामुळे कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.

समाजकल्याण कार्यालयाला टाळे
औरंगाबाद : समाजकल्याण विभागाच्या खोकडपुरा येथील विभागीय कार्यालयाला शुक्रवारी दुपारी काही कार्यकर्त्यांनी कुुलूप ठोकले. यामुळे कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले.
समाजकल्याण विभागाच्या वेदांतनगर येथील वसतिगृहाच्या अकरावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळत नाही. यातील केटरिंगचे काम करणाऱ्या अकरावीतील विद्यार्थी ज्ञानेश्वर राठोड याचा तीन दिवसांपूर्वी नगर नाक्याजवळ अपघाती मृत्यू झाला. विद्यार्थ्यांना राहण्याची परवानगी असती तर हा अपघात झाला नसता, असा आरोप करून रवी गायकवाड तसेच इतर कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी समाजकल्याण विभागाचे विभागीय उपायुक्त वळवी यांना निवेदन देण्यासाठी गेले. मात्र, तेथे एकही वरिष्ठ अधिकारी नसल्याचे पाहून या कार्यकर्त्यांनी समाजकल्याण विभागाच्या एका बाजूच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. यामुळे बाहेरील नागरिक व विद्यार्थ्यांना आत प्रवेश मिळाला नाही. समाजकल्याण आयुक्त वळवी यांच्यासह सहआयुक्त जे. एस. एम. शेख हे दोन्ही अधिकारी गैरहजर होते. यापैकी शेख हे रजेवर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या रजेच्या अर्जाबाबत गोंधळ होता.
कार्यालयाला कुलूप ठोकल्याचे समजताच क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. ज्या वेदांतनगर येथील वसतिगृहातील विद्यार्थी मृत्यू पावला तेथील वॉर्डनलाही पाचारण करण्यात आले. यावेळी गायकवाड यांच्यासह वसतिगृह वॉर्डन आणि समाजकल्याण निरीक्षक मोरे यांची चर्चा झाली. जोपर्यंत अधिकारी कार्यालयात येत नाहीत व विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत योग्य ती कार्यवाही सुरू होत नाही, तोपर्यंत कुलूप काढणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. सरकारी कार्यालयात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आव्हानही कार्यकर्त्यांनी दिले. यानंतर गायकवाड यांच्यासह काही कार्यकर्त्यांना क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी स्वत: ते कुलूप काढून टाकले.