कार्यालयांत शुकशुकाट
By Admin | Updated: September 30, 2014 01:27 IST2014-09-30T00:09:24+5:302014-09-30T01:27:00+5:30
लातूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत़ त्यामुळे दैनंदिन चालणारी नागरिकांची कामे खोळंबली आहेत़

कार्यालयांत शुकशुकाट
लातूर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने शासकीय कार्यालयातील अनेक अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत़ त्यामुळे दैनंदिन चालणारी नागरिकांची कामे खोळंबली आहेत़ विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी, कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे़ एरवी गजबजलेल्या लातूर शहर महानगरपालिकेत नागरिकांची गर्दी घटली आहे़
लातूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग वगळता अन्य कार्यालयांत नागरिकांची गर्दी घटली आहे़ आचारसंहिता काळात स्थानिक प्रशासनही धोरणात्मक निर्णय घेण्यात येत नसल्याचे सांगत असल्याने दिवसेंदिवस शासकीय कार्यालयातील शुकशुकाट वाढत आहे़ शिवाय, अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने कार्यकर्त्यांनी शासकीय कार्यालयांकडे पाठ फिरविली आहे़ लातूर शहर महानगरपालिका दिवसभर नागरिकांच्या गर्दीने गजबजलेली असते़ गेल्या आठवडाभरापासून मनपात कार्यकर्तेही फिरकत नसल्याने मनपात शुकशुकाट दिसून येत आहे़ पंचायत समिती, तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र, उपविभागीय कार्यालय, महानगरपालिका, बांधकाम भवन, जात पडताळणी कार्यालय, जिल्हा परिषद, समाजकल्याण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत तसेच अन्य शासकीय कार्यालयातील गर्दी ओसरली आहे़ अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबर कार्यकर्तेही निवडणुकीच्या कामात गुंतल्याने कार्यालये ओस पडली आहेत़ (प्रतिनिधी)
औसा रोडवरील बांधकाम भवन येथे एरवी कंत्राटदारांची मोठी रेलचेल असते़ नवीन कामे, झालेल्या कामाची बिले अन्य कामासंदर्भात कार्यालय परिसरात रंगणाऱ्या गप्पा कमी झाल्या आहेत़ कंत्राटदार निवडणुकीच्या कामात लागले आहेत़ बांधकाम विभागाच्या बहुतांश अधिकाऱ्यांनाही निवडणुकीचे शासकीय काम लागल्याने कर्मचारी निवांत आहेत़