छत्रपती संभाजीनगर : शेंगदाणा आणि गुळाच्या लाडवांत केवळ गोडवा नव्हता, तर त्यात मिसळली होती माउलींची माया, ओतप्रोत श्रद्धा आणि विठोबाच्या चरणी अर्पण करण्याची आर्त ओढ. ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या भक्तिभावाने प्रेरित होऊन छत्रपती संभाजीनगरातील मातृशक्ती रविवारी एकवटली होती. दीड हजार महिला हातांनी लाडू बांधत होत्या. ओठांवर ‘विठोबा रुखुमाई’च्या नामस्मरणाचा गजर घुमत होता. भक्तीच्या या पर्वात अवघ्या ६ तासांत तब्बल १ लाख ९ हजार लाडू बांधले गेले.
विठ्ठलाला नैवेद्य व वारकऱ्यांना फराळमागील १८ वर्षांपासून वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे ‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’हा उपक्रम राबवला जातो. २०२३ मध्ये ५१ हजार लाडू, २०२४ मध्ये ७१ हजार लाडू, तर यंदा विक्रम करीत सव्वा लाख लाडू तयार केले आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी (६ जुलै) या सर्व लाडवांचा नैवेद्य मोठ्या पंढरपुरातील मंदिरात विठ्ठलास दाखविण्यात येणार आहे. त्यानंतर वारकऱ्यांना फराळ रूपात हे लाडू वाटप करण्यात येणार आहेत.
२ हजार किलो शेंगदाणा, गूळसव्वा लाख लाडू तयार करण्यासाठी २ हजार किलो शेंगदाणा, गूळ व २०० किलो गावरान तुपाचा वापर करण्यात आला.
१० किलोच्या लाडूने लक्ष वेधलेजालना रोडवरील पाटीदार भवनात महिला गटागटाने रिंगण तयार करून लाडू बांधण्यासाठी बसल्या होत्या. धर्मपीठावर विठ्ठलाची भव्य मूर्ती व त्यासमोर ठेवलेला १० किलोचा एक भला मोठा लाडू सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
द्वादशीला २०० किलो पुरणाच्या पोळ्यांचे भोजनशेकडो मैल पायी चालून पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना आषाढी एकादशीला शेंगदाणा-गुळाच्या लाडूचा फराळ आणि द्वादशीच्या दिवशी पुरणपोळीचे जेवण छत्रपती संभाजीनगरातील भाविकांतर्फे देण्यात येते. यंदा २०० किलो पुरणाच्या पोळ्या, आमटी, २ क्विंटल पुलाव आणि २ क्विंटल शिऱ्याचे जेवण देण्यात येणार आहे. यासाठी वारकरी सेवा चॅरिटेबल फाउंडेशनचे १०० स्वंयसेवक पंढरपूरला जाणार आहेत. यासाठी वारकरी सेवा चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज सुर्वे, डॉ. भैरव कुलकर्णी, प्रदीप राठोड, लक्ष्मीकांत सुर्वे, योगेश कोटगिरे, उमाकांत वैद्य, अनिल लाले, उदय चावडा, विलास गायकवाड यांच्यासह अन्य स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.