आठवड्याला पाणी, प्रस्ताव स्थायीला सादर
By Admin | Updated: August 20, 2014 23:53 IST2014-08-20T23:53:02+5:302014-08-20T23:53:45+5:30
नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला

आठवड्याला पाणी, प्रस्ताव स्थायीला सादर
नांदेड: विष्णूपुरी प्रकल्पातील अत्यल्प साठ्यामुळे शहराला आठवड्यात एक दिवस पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे सादर केला असून स्थायीच्या सभेत यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती सभापती उमेश पवळे यांनी दिली़
पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे़ यंदाही एकही मोठा पाऊस न झाल्यामुळे नद्या, नाल्यांना पुर आला नाही़ तसेच जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पाची पाणीपातळीही वाढली नाही़ विष्णूपुरी प्रकल्पाद्वारे नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो़ या प्रकल्पात उन्हाळ्यात ४० दलघमी पाणी उपलब्ध होते़ त्यामुळे जुन महिन्यापर्यंत शहराला एक दिवसआड पाणी सोडण्यात आले़ मात्र पावसाळ्यात एकाही नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही़ विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ७ टक्के जलसाठा उपलब्ध राहिल्याने नांदेड शहराच्या पाणी कपातीचा निर्णय मनपाने घेतला़
त्यानंतर १३ जुलैपासून शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस आड करण्यात आला़ दरम्यान, दिग्रस बंधाऱ्यातून ९ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात सोडण्यात आले़ या पाण्यामुळे विष्णूपुरी प्रकलत १५ दलघमी पाणी साठा निर्माण झाला़ सध्या विष्णूपुरी प्रकल्पात ९ दलघमी पाणी उपलब्ध असून हे पाणी दोन दिवसआड सोडल्यास ४५ दिवस पुरणार आहे़
याविषयी महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचे संकेत दिले होते़ पाणी बचतीचे धोरण स्वीकारून पुढील दोन, तीन, महिने हा साठा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासंदर्भात बुधवारी मनपा प्रशासनाने स्थायी समितीसमोर आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव सादर केला़ येत्या २५ आॅगस्ट रोजी स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावावर निर्णय होणार असल्याचे सभापती उमेश पवळे यांनी सांगितले़
दरम्यान, महापालिकेने पाणी बचतीचे धोरण राबविण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे़ बांधकामासाठी, वाहने धुणे, रस्त्यावर पाणी टाकणे यावर निर्बंध घातले आहेत़ (प्रतिनिधी)