जमीन बळकावणाऱ्या सावकाराविरूद्ध गुन्हा

By Admin | Updated: December 17, 2014 00:38 IST2014-12-17T00:32:57+5:302014-12-17T00:38:32+5:30

वैजापूर : सावकाराविरूद्ध नव्याने लागू झालेल्या सावकारी अधिनियमाच्या कलम ४८ अन्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Offense Against Foreclosure | जमीन बळकावणाऱ्या सावकाराविरूद्ध गुन्हा

जमीन बळकावणाऱ्या सावकाराविरूद्ध गुन्हा

वैजापूर : बेकायदेशीर सावकारी करून एका शेतकऱ्याची दोन एकर शेतजमीन बळकावणाऱ्या सावकाराविरूद्ध नव्याने लागू झालेल्या सावकारी अधिनियमाच्या कलम ४८ अन्वये वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या सावकाराच्या घरावर जून महिन्यात सहकार विभागाने टाकलेल्या छाप्यात काही आक्षेपार्ह दस्तऐवज मिळून आला होता. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून प्रकरण भिजत ठेवल्याने तक्रारदारानेच न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने फटकारल्यावर ६ महिन्यांनंतर मंगळवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा सावकारी करणाऱ्याविरुद्ध वैजापूर तालुक्यात हा पहिला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शेख चिरागोद्दीन शेख लाल, रा. दुर्गानगर असे यातील आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील लाख खंडाळा येथील संजय काळू वैद्य यांनी येथील शेख चिरागोद्दीन यांच्याकडून १ लाख रुपये कर्ज घेतले होते. या व्यवहारापोटी वैद्य यांनी आपल्या दोन एकर शेतजमिनीचे खरेदीखत चिरागोद्दीन यांच्या नावे करून दिले होते. तसेच सावकारीबाबत वेगळा करारही करून दिला होता. करारात ठरल्याप्रमाणे वैद्य यांनी सर्व मुद्दल व व्याजाची परतफेड केलेली असतानाही शेख चिरागोद्दीन यांनी आपल्याकडील खरेदीखताच्या आधारे सन २०१२ मध्ये शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर स्वत:च्या नावाची नोंद घेतली. या नोंदीवरून वैद्य यांनी वैजापूर येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने या प्रकरणी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले होते. सदरील शेतजमिनीवर वैद्य यांचा ताबा असताना कागदोपत्री मात्र, सावकाराचेच नाव होते.
दरम्यान, संजय वैद्य यांनी दिलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशीत शेख चिरागोद्दीन शेख लाल, रा.वैजापूर हे अवैध सावकारी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी सुधीर गाढे यांच्या तक्रारीवरून सावकारी अधिनियमाच्या कलम २३, ३९, ४५ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे कलम ४८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्य यांनी सहायक निबंधकांकडे अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या शेख चिरागोद्दीनविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणात न्यायालयाने सहकार सचिवांना नोटीस बजावीत सहायक निबंधक व पोलीस निरीक्षक वैजापूर यांना चांगलेचे फटकारले होते.

Web Title: Offense Against Foreclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.