लाचप्रकरणी लेखा कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 7, 2014 00:16 IST2014-07-06T23:36:37+5:302014-07-07T00:16:03+5:30
जालना : वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वरिष्ठ सहायक विनोद भांडवलेविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचप्रकरणी लेखा कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
जालना : अंबड पंचायत समितीअंतर्गत सेवा केलेल्या मयत कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या रक्कमेचा धनादेश देण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या लेखा विभागाच्या वरिष्ठ सहायक विनोद भांडवले याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कर्मचारी जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत होते. १७ जुलै २०१३ रोजी ते आजारपणामध्येच मयत झाले. त्यांच्या औषधोपचारासाठी झालेल्या खर्चाचा परतावा मिळण्यासाठी मयत कर्मचाऱ्याच्या पुत्राने वेगवेगळी वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्याकरिता गटशिक्षणाधिकारी अंबड यांच्यामार्फत जि.प. जालना येथे प्रस्ताव दाखल केला होता.
सदर वैद्यकीय प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर करून गटविकास अधिकारी अंबड यांना पुढील कार्यवाहीबाबतचे आदेश दिलेले होते.
सदर प्रतिपूर्तीपोटी १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश मिळण्यासाठी तक्रारदार (मयताचे पुत्र) हे संबंधित लिपिक भांडवले यांना जाऊन भेटले असता ते म्हणाले की, ‘धनादेश मीच तयार करून साहेबांची सही घेऊन तुम्हाला देणार आहे; परंतु त्यासाठी मला ५ हजार रुपये द्यावे लागतील.’ त्यावर तक्रारदार यांनी ‘वडील मयत झालेले आहेत, आमच्याजवळ कशाचे पैसे’ असे सांगितले. मात्र भांडवले म्हणाले की, ‘ते मला माहिती नाही, ५ हजार रुपये दिल्याशिवाय मी तुमचा धनादेश तयार करून साहेबांची सही घेऊन तुम्हाला देणार नाही’. त्यावेळी तक्रारदार नाईलाजास्तव हो म्हणाले. मात्र नंतर तक्रारदाराने अॅन्टी करप्शनकडे तक्रार केली. त्यावरून भांडवले यांच्या लाचेच्या मागणीची पडताळणी पं.स. येथे जाऊन पंचासमक्ष करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
सापळा अयशस्वी; मात्र लाच मागितल्याचे निष्पन्न
३ जुलै रोजी पुन्हा सापळा लावला असता भांडवले यांनी तक्रारदार यांना थोडे थांबण्यास सांगितले. परंतु बराच वेळ थांबून देखील त्यांना धनादेश न मिळाल्याने तक्रारदार यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना समक्ष भेटून भांडवले धनादेश देत नसल्याचे सांगितले. त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी भांडवले यांना बोलावून धनादेश का दिला नाही, याबाबत विचारून त्यांची कानउघाडणी केली व धनादेश देण्यास सांगितले. तेव्हा भांडवले यांनी सायंकाळपर्यंत धनादेश देतो, असे सांगून काही वेळाने चेक सुलताने यांच्याकडे दिल्याचे सांगितले. तक्रारदाराकडून पैसे घेण्याचे टाळले. सुलताने यांना फोनवरून चेक मिळाला किंवा कसे याबाबत खात्री केली असता त्यांनी धनादेश मिळाल्याबाबत सांगितले.