एका आरोपीस दंडाची शिक्षा
By Admin | Updated: July 25, 2014 00:31 IST2014-07-24T23:52:12+5:302014-07-25T00:31:46+5:30
औंढा नागनाथ : शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून शासकीय खुणा उपटून टाकून पेरणी केली

एका आरोपीस दंडाची शिक्षा
औंढा नागनाथ : शेतात अनधिकृतपणे प्रवेश करून शासकीय खुणा उपटून टाकून पेरणी केली व शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोषी ठरवून न्यायालयाने एका आरोपीस एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल औंढा नागनाथ येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दिला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील वडचुना येथील जेमला रामसिंग चव्हाण (वय ७०) यांनी त्यांच्या मालकीच्या शेत गट क्र. ८ मधील जमिनीची शासकीय मोजणी करून घेतली होती. त्यानुसार औंढा येथील तालुका भुमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी पूर्ण झाल्यानंतर जेमला चव्हाण यांच्या शेताच्या खुणा कायम केल्या होत्या.
८ जुलै २००६ रोजी जेमला चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करीत असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बालाजी शिवराम चिलगर (वय ३२), शिवराम फकीरा चिलगर (५५), मंजुळाबाई शिवराम चिलगर (४७, सर्व रा. वडचुना ता. औंढा) यांनी चव्हाण यांच्या शेतात अनधिकृतरित्या प्रवेश केला. तसेच औंढा येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने जेमला चव्हाण यांच्या शेतात करून दिलेल्या खुणा उपटून फेकून दिल्या व पेरणी केली. यावेळी शेतकरी जेमला चव्हाण यांना त्या तिघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली, या आशयाची फिर्याद चव्हाण यांनी औंढा पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी बालाजी शिवराम चिलगर (३२), शिवराम फकीरा चिलगर (५५), मंजुळाबाई शिवराम चिलगर (४७, सर्व रा. वडचुना, ता. औंढा) यांच्याविरूद्ध कलम ४४७, ४३४, ५०४, ५०६ , ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीक तपासिक अंमलदार पोहेकाँ ए. एन. इंगळे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात तिन्ही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला औंढा येथील प्रथमवर्ग न्यायालयात चालला. यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकुण चार साक्षीदार तपासण्यात आले.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. शेंडगे यांनी २१ जुलै रोजी खटल्याचा निकाल दिला. यात आरोपी बालाजी शिवराम चिलगर यास जेमला चव्हाण यांच्या शेतातील खुणा उपटून टाकल्याबाबत कलम ४३४ भादंविनुसार दोषी ग्राह्य धरून त्यास एक हजार रूपये दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली. दंडाच्या एकूण रकमेपैकी पाचशे रुपये तक्रारदार शेतकरी जेमला चव्हाण याला नुकसान भरपाई म्हणून द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
या खटल्यात शिवराम फकीरा चिलगर (वय ५५), मंजुळाबाई शिवराम चिलगर या दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. महेश आहेर यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
दोघांची निर्दोष मुक्तता
औंढा नागनाथ तालुक्यातील वडचुना शिवारात शेतीच्या वादातून ८ जुलै २००६ रोजी घडलेली घटना.
जेमला रामसिंग चव्हाण (वय ७०) यांनी त्यांच्या मालकीच्या शेत गट क्र.८ मधील जमिनीची शासकीय मोजणी करून घेतली होती.
औंढा तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने शेताच्या खुणाही कायम केल्या होत्या.
गावातील तिघांनी चव्हाण यांच्या शेतात अनधिकृतरित्या प्रवेश करीत शेतातील शासकीय खुणा उपटून फेकून दिल्या व पेरणी केली होती.
या घटनेच्या वेळी शेतकरी जेमला चव्हाण यांना त्या तिघांनी शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
औंढा पोलिस ठाण्यात आरोपी बालाजी शिवराम चिलगर, शिवराम फकीरा चिलगर, मंजुळाबाई शिवराम चिलगर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी बालाजी शिवराम चिलगर यास न्यायालयाने १ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली असून सबळ पुराव्याअभावी इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.