अपघात विभागाच्या पायरीवरच प्रसूती
By Admin | Updated: June 16, 2017 00:59 IST2017-06-16T00:56:26+5:302017-06-16T00:59:09+5:30
औरंगाबाद : स्ट्रेचर न मिळाल्याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली.

अपघात विभागाच्या पायरीवरच प्रसूती
मुजीब देवणीकर, संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्ट्रेचर न मिळाल्याने घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरच एका महिलेची प्रसूती झाल्याची घटना गुरुवारी (दि. १५) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. स्ट्रेचर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी नसल्याचे म्हणत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हात झटकले. स्ट्रेचर शोधण्यात वेळ गेल्याने शेवटी अपघात विभागासमोरच उघड्यावर महिलेची प्रसूती झाली. डॉक्टर व कर्मचाऱ्यांत स्ट्रेचरवरून सुरू असलेला टोलवाटोलवीचा हा प्रसंग घाटीत उपस्थित ‘लोकमत’ प्रतिनिधीसमोरच घडला.
चिकलठाणा परिसरातील एका गरोदर महिलेस मध्यरात्रीनंतर प्रसूती वेदना होऊ लागल्याने नातेवाइकांनी रिक्षातून पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घाटीत आणले. रिक्षा अपघात विभागासमोर थांबविण्यात आली. रुग्णाला विभागात नेण्यासाठी नातेवाइकांनी स्ट्रेचरची शोधाशोध केली. अपघात विभागातील वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. राहुल पांढरे यांच्याकडे नातेवाइकांनी स्ट्रेचरची मागणी केली. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. स्ट्रेचर देणे हे माझे काम नाही. रुग्णाला पाहण्यास मी बाहेर पण येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामध्ये १५ मिनिटे गेली. महिलेस प्रसूती वेदना असह्य झाल्या होत्या. नातेवाइकांनी तिला रिक्षातून बाहेर काढले. आतमध्ये नेत असताना अपघात विभागाच्या पायरीसमोरच ती खाली बसली. उघड्यावरच प्रसूती होणार असल्याची परिस्थिती लक्षात येताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. चादरीचा आडोसा करण्यात आला. काही मिनिटांतच महिलेने गोंडस बाळास जन्म दिला. प्रसूती झाल्यानंतर सीएमओ डॉ. पांढरे आणि दोन परिचारिका धावत आल्या. परिस्थिती पाहिल्यानंतरही त्यांनी बघ्याची भूमिका घेतली.
नागरिकांनी धावपळ करून स्ट्रेचर आणले; परंतु तोपर्यंत बराच वेळ झाला होता. शेवटी त्याच स्ट्रेचरवरून बाळ व बाळंतिणीस वॉर्डात दाखल करण्यात आले. प्रसूती झाल्यानंतर महिलेचे नातेवाइक माझ्याकडे आले. रिक्षातून उतरल्यानंतर (पान २ वर)