अवैध वाळूचा जप्त केलेला टेम्पो घेऊन जाताना वाळू तस्करांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:06 IST2020-12-30T04:06:55+5:302020-12-30T04:06:55+5:30
देवगाव रंगारी : खापरखेडा येथे अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री करणार्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जप्त करण्यात ...

अवैध वाळूचा जप्त केलेला टेम्पो घेऊन जाताना वाळू तस्करांचा अडथळा
देवगाव रंगारी : खापरखेडा येथे अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री करणार्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेला वाळूचा टेम्पो घेऊन जाताना तीन वाळूमाफीयांनी पोलिसांना अडथळा निर्माण केला. तेव्हा पोलिस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांनी ठाण्यातून अधिक फोर्स मागविली असता वाळूमाफीयांनी घटनास्थळावरून पळ काढला. वाळूचा टेम्पोचालक व अडथळा आणणारे कारमधील तिन जणांविरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी दोन वाहने, वाळूसह अकरा लाख दहा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन दिवसात ही दुसरी कारवाई झाल्याने वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा येथील नदी पात्रातून एक टेम्पो अवैध वाळू भरून खापरखेडा गावात वाळू विक्री करणार आहे, अशी माहिती देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई एस. एच. पैठणकर यांना मिळाली. त्यानुसार दोन पंचासहीत त्यांनी विटा भागातील रस्त्यावर गस्त दिली. सोमवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास टेम्पो (क्र. एम. एच. ०४ ऐजी ३६६२) हा घटनास्थळावरून जात होता. त्याला पोलिसांनी थांबविले असता. समोर पोलीस दिसून आल्याने टेम्पोचालक फरार झाला. त्यावेळी पोलीसांनी पंचनामा करीत अवैधरित्या वाळू नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईत जप्त झालेला टेम्पो ठाण्यात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात एक (क्र. एम. एच. ०६, ऐएन ९५२७) कार टेम्पोसमोर आडवी लावली. त्या कार मधून राजू चुगडे, योगेश जाधव व चालक शफीक हे बाहेर पडले. पो.उपनिरीक्षक जोगदंड यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी जोगदंड यांनी कारवाई होणार आहे, असे सांगत ठाण्यातून आणखी मदत मागविली. व पोलीस शिपाई पैठणकर यांना वाळूचा टेम्पो ठाण्यात घेऊन जाण्याचे आदेश दिले. तेव्हा टेम्पोसमोर पुन्हा कार आडवी लावली. तेवढ्यात पोलीसांचा आणखी ताफा येत असल्याचे दिसताच तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. त्यांनतर मदतीला आलेले पोलीस कर्मचारी मनोज लिंगायत, धुमाळ व गवळी यांच्या साह्याने दोन्ही वाहनांसह अकरा लाख दहा हजाराचा मुदेमाल जप्त केला. पो. उपनिरीक्षक जोगदंड यांच्या फिर्यादीवरून टेम्पो चालक व कारमधील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल शिवनाथ आव्हाळे करीत आहे.
---------------
देवळी व झोलेगाव येथे अवैध वाळू तस्कराचा उन्माद
देवगाव रंगारी परिसरात विशेष करून देवळी व शिऊर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोलेगाव शिवारातून अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. त्यात नदीकाठच्या शेतकर्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. २० डिसेंबर रोजी झोलेगाव शिवारातील नदीपात्रात रात्री आठच्या सुमारास वाहनचालक व शेतकर्यात वाद झाला. त्याचे छायाचित्र सर्वत्र व्हायरल झाले.
फोटो : देवगाव रंगारी या नावाने फोटो सेव्ह आहे.
ओळ : पोलिसांनी जप्त केलेला वाळूचा टेम्पो व कार.