२१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे उद्दिष्ट
By Admin | Updated: June 30, 2014 00:41 IST2014-06-30T00:09:27+5:302014-06-30T00:41:04+5:30
बालासाहेब काळे, हिंगोली केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यास २०१४-१५ या वर्षासाठी २१ हजार शिष्यवृत्ती लाभार्थी निवडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
२१ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे उद्दिष्ट
बालासाहेब काळे, हिंगोली
केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यास २०१४-१५ या वर्षासाठी २१ हजार शिष्यवृत्ती लाभार्थी निवडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील भूमिहीन शेतमजूर लाभार्थ्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील भूमिहिन कुटुंबातील प्रमुख कमावत्या व्यक्तीला विम्याचे संरक्षण देणारी तसेच शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना दरमहा शिष्यवृत्ती देणारी ही योजना राज्य व केंद्र शासनाच्या वतीने २००७ पासून राबविण्यात येत आहे. त्यात १५ जून २०११ च्या आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या निकषानुसार १८ ते ५९ वयोगटातील भूमिहिन शेतमजूर हा योजनेचा पात्र लाभार्थी आहे. या निकषांमध्ये राज्य शासनाने काही बदल करून अडीच एकर बागायत किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेला शेतकरीसुद्धा या योजनेचा पात्र लाभार्थी राहील, अशी सुधारणा केली आहे. वार्षिक प्रतिलाभार्थी २०० रूपये विमा हप्त्यापैैकी १०० रूपये केंद्र शासन तर १०० रूपये राज्य शासन भरते. त्यामुळे लाभार्थ्यास या योजनेचा मोफत लाभ मिळतो. लाभार्थ्यास अपघाती मृत्यू आल्यास ७५ हजार रूपये, नैैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपये लाभार्थ्याच्या कुटुंबियास विमा संरक्षण देय आहे. लाभार्थ्याचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास, एक डोथ व एक पाय निकामी झाल्यास किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रूपये नुकसान भरपाई देय आहे. याशिवाय या लाभार्थ्याच्या नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन अपत्यांना आम आदमी योजना शिष्यवृत्ती १०० रूपये दरमहा याप्रमाणे देय आहे. २०१३ मध्ये आम आदमी विमा योजनेत जिल्ह्यास ५० हजार लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामध्ये भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील ६६ हजार २८४ लाभार्थ्यांचा ‘एलआयसी’कडे डाटा पाठविला असून त्यापैैकी ५८ हजार ७८० जणांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे.
तसेच शिष्यवृत्तीचे लाभार्थी असलेल्या ५ हजार ४९४ विद्यार्थ्यांचे अर्ज ‘एलआयसी’कडे पाठविण्यात आले. त्यापैैकी ४ हजार ६९४ अर्ज अपलोड करण्यात आले आहेत. यातील ३ हजार ३३१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आली २२ लाख ३३ हजारांची रक्कम त्यांना अदा करण्यात आली. यात ६६३ विद्यार्थी अपात्र ठरले असून १३२ अर्ज अपलोड करण्याची प्रक्रिया बाकी आहे. दरम्यान, ७ जून अखेर आम आदमी विमा योजनेचे लाभार्थी-शिष्यवृत्तीचे महा-ई-सेवा केंद्राद्वारे आॅनलाईन १४ हजार ४५२ अर्ज भरण्यात आले आहेत. त्यातील १४ हजार ४५२ अर्ज पुढील कार्यवाहीसाठी ‘एलआयसी’कडे पाठविण्यात आले असून त्यांना १३ हजार ७०० अर्ज प्राप्त झाल्याची नोंद आहे. एलआयसी पोर्टलवरून २ हजार १९० अर्ज गायब झाले असून एलआयसीने केवळ ७ हजार ३ डाटा मंजूर केला आहे. एलआयसीने विम्याच्या रकमेपोटी एकूण ३३ लाख ६८ हजार रूपये प्रशासनाकडे दिले असून ३ हजार ५२५ लाभार्थ्यांचा डाटा अपात्र ठरविण्यात आला आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून चालू शैक्षणिक वर्षामध्ये नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैैकी या योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज शाळेमध्ये वर्गशिक्षकांनी व्यवस्थित व परिपूर्ण भरून घ्यावेत. त्यासोबत विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये त्यांचे खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जोडावी, अशा सूचना दिल्या आहेत. अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया १ ते ५ जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.
जुलै महिन्यात शिष्यवृत्तीचा कार्यक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, सेनगाव, हिंगोली, वसमतच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हिंगोली तालुक्यामध्ये ४ हजार, कळमनुरी-४ हजार १००, सेनगाव ४ हजार, वसमत- ४ हजार, औंढा नागनाथ- ४ हजार असे लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती वाटपाच्या नियोजनासाठी २७ जून रोजी हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीस शिक्षणाधिकारी शिवाजी पवार, आम आदमी विमा योजनेचे जिल्हा समन्वयक अव्वल कारकून डी.एम.गुंजकर यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, बँकांचे अधिकारी, तालुकास्तरीय संबंधित अधिकारी व सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
१ ते ५ जुलैपर्यंत शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे परिपुर्ण अर्ज भरून घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.