अस्वच्छता,साथीचे आजार वाढले...!
By Admin | Updated: July 24, 2014 00:38 IST2014-07-24T00:20:20+5:302014-07-24T00:38:39+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरात अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले असून, खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.

अस्वच्छता,साथीचे आजार वाढले...!
वाळूज महानगर : बजाजनगरात अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले असून, खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. याविषयी जि.प.सदस्य अनिल चोरडिया यांनी आरोग्य विभाग व एमआयडीसीकडे तक्रारी केल्यामुळे आज या दोन्ही विभागांच्या पथकाने भेट दिली.
बजाजनगर कामगार वसाहतीतील स्वच्छतेकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष असल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. ड्रेनेज लाईनचे काम रखडल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. विविध सेक्टर्समधील ड्रेनेज लाईनचे सेफ्टी टँक चोकअप होत असल्यामुळे पाणी उघड्यावर साचते. कचरा व नाल्यांची नियमितपणे सफाई होत नाही. गेल्या १५ दिवसांपासून परिसरात साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. ताप येणे, मळमळ होणे, थंडी वाजणे, अंग व सांधे दुखणे आदींचा त्रास त्यांना होत आहे. याविषयी ‘लोकमत’ ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभाग व एमआयडीसीचे पितळ उघडे पाडले होते. त्यानंतर अनिल चोरडिया व युवा सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता.
आरोग्य विभागाने घेतला आढावा
आरोग्य विभागाकडून पाहणी
बजाजनगरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आज आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाविस्कर, डॉ. जयश्री लहाने, डॉ. बोराडे, तर एमआयडीसीचे उपअभियंता दिलीप परळीकर, जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. एमआयडीसीने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेतली. नाल्यांची साफसफाई करून औषध फवारणी सुरूकेली.
आरोग्य विभाग रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांना उपचाराचे मार्गदर्शन करीत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, अंकुश पुंड, युवा सेनेचे तालुकाधिकारी अमित चोरडिया, रवींद्र राठोड, सुमित गुरव, अजय राठोड आदी उपस्थित होते.