दहा दिवसांपासून ५२ शाळांत पोषण आहार बंद
By Admin | Updated: June 29, 2014 00:39 IST2014-06-29T00:24:47+5:302014-06-29T00:39:47+5:30
उमरगा : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने ५२ शाळांमध्ये ९ हजार विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

दहा दिवसांपासून ५२ शाळांत पोषण आहार बंद
उमरगा : शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या तांदळाचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील खाजगी व जि.प. च्या २१० शाळांपैकी ५२ शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने या शाळांतील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना मागील दहा दिवसांपासून शालेय पोषण आहाराचे वाटप बंद असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जि.प. व खाजगी शाळातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गात शिक्षणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनात तांदळाची खिचडी देण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे शाळेच्या पाहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देणे बंधनकारक असताना जि.प. व खाजगीच्या एकूण २१० शाळांपैकी ५४ शाळांमधील शालेय पोषण आहाराचा तांदूळ शिल्लक नसल्याने शाळा सुरु झाल्यापासून मध्यान्ह भोजनात देण्यात येणाऱ्या ५४ शाळांतील खिचडीचे वाटप बंद आहे.
तालुक्यात जि.प.व खाजगीच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या एकूण १९५ शाळा आहेत. ६ वी ते ८ वी च्या एकूण १२५ शाळातील १३ हजार ६९७ विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीच्या २२ हजार ८७६ विद्यार्थी याचा लाभ घेतात.
पहिली ते पाचवीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस प्रतिदिन १०० ग्रॅम तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना प्रतिदिन १५० ग्रॅम तांदळाची खिचडी शिजवून देण्याचा नियम आहे. पहिली ते पाचवीसाठी प्रतिमहा २ हजार २८७ किलो तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिमहा २ हजार ५४ किलो तांदळाची गरज भासते. तालुक्यातील १ ली ते ८ वी च्या २१० शाळामधील ३६ हजार ५७३ विद्यार्थ्यांना प्रतिमहा चार हजार ५४ किलो तांदळाच्या खिचडीचे वाटप केले जाते. खिचडी शिजवून देणाऱ्या स्वयंपाक्यास विद्यार्थी संख्येप्रमाणे मानधन दिले जाते. तालुक्यातील जवळपास ५०० स्वयंपाक्यांना ५ लाख रुपयांचे प्रतिमहा मानधन दिले जाते.
विद्यार्थी संख्येच्या गरजेप्रमाणे प्रत्येक शाळांना शालेय पोषण आहाराच्या तांदळाचे वाटप करण्यात येते. मात्र तालुक्यातील ५२ शाळांकडे तांदळाची उपलब्धता नसल्याने व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शालेय पोषण आहाराच्या तांदळाची उपलब्धता होत नसल्याने ५२ शाळातील जवळपास ९ हजार विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप शाळा सुरु झाल्यापासून बंद आहे.
तांदूळ शिल्लक नसलेल्या शाळांच्या मागणीप्रमाणे शालेय पोषण आहाराच्या तांदळाची मागणी संबंधितांकडे करण्यात आली असून, येत्या चार दिवसात उपलब्धता झाल्यास मागणीप्रमाणे शाळांना तांदूळ देण्यात येणार आहे.
- अंकुश शिंगडे,
अधीक्षक, शालेय पोषण आहार.