परिचारिकांना मिळाला आगळावेगळा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:05 IST2021-05-13T04:05:36+5:302021-05-13T04:05:36+5:30
औरंगाबाद : जागतिक परिचारिका दिनानिमित्त मुळे आण्णा सोशल फाउंडेशनतर्फे बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९५ परिचारिकांना पाण्याची बाटली आणि टिफिन ...

परिचारिकांना मिळाला आगळावेगळा आधार
औरंगाबाद : जागतिक परिचारिका दिनानिमित्त मुळे आण्णा सोशल फाउंडेशनतर्फे बुधवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील १९५ परिचारिकांना पाण्याची बाटली आणि टिफिन बाॅक्सचे वाटप करण्यात आले. परिचारिका दिनी मिळालेल्या आगळ्यावेगळ्या भेटीने परिचारिका भारावून गेल्या.
मुळे आण्णा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश आण्णा मुळे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते परिचारिकांना पाण्याची बाटली आणि टिफिन बाॅक्सचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सचिव सुखदेव मुळे, समाधान बहादुरे, मेट्रन सुरेखा नाईक यांच्यासह रुग्णालयातील परिचारिकांची उपस्थिती होती. यावेळी रमेश आण्णा मुळे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव असताना परिचारिका दिवसरात्र रुग्णसेवा देत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविला. समाजातील गरजूंनाही मदत मिळणे गरजेचे असते. त्यासाठी इतरांनी पुढे आले पाहिजे, असे ते म्हणाले. सुरेखा नाईक म्हणाल्या, रुग्णसेवा करताना प्रत्येकाचे सहकार्य मिळते. आजच्या दिवशी पाण्याची बाटली आणि टिफिन बाॅक्सची भेट ही आमच्यासाठी आनंदीदायी ठरली आहे, असे त्या म्हणाल्या.
फोटो ओळ..
जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांना पाण्याची बाटली, टिफिन बाॅक्सचे वाटप करताना मुळे आण्णा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश आण्णा मुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी.