लग्नमंडपाऐवजी नियोजित नवरदेव गुपचूप मुंबईला
By Admin | Updated: May 22, 2017 00:13 IST2017-05-22T00:12:43+5:302017-05-22T00:13:23+5:30
जालना :लग्न मंडपात पोचण्याऐवजी नवरदेव गुपचूप मुंबईला निघून गेला. वऱ्हाडी मंडळी आलीच नाही.

लग्नमंडपाऐवजी नियोजित नवरदेव गुपचूप मुंबईला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वधू वरांची पसंती झाली..लग्न तिथीही ठरली..वधू पित्याच्या दारी मंडप थाटला..
वऱ्हाडींच्या पाहुणचारासाठी सकाळपासून लगबग सुरू झाली. मात्र, लग्न मंडपात पोचण्याऐवजी नवरदेव गुपचूप मुंबईला निघून गेला. वऱ्हाडी मंडळी आलीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर वधू पित्याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शहरातील टीव्ही सेंटर म्हाडा कॉलनी परिसरात रविवारी हा प्रकार घडला.
जालन्यातील टीव्ही सेंटर परिसरात राहणारी युवती व राजंणी (ता.अंबड) येथील राहुल शामराव जाधव या दोघांचा विवाह रविवारी दुपारी साडेबारा वाजता लावण्याचे नियोजित होते. त्यासाठी वधू पित्याकडे सकाळपासूनच धावपळ सुरू होती. मात्र, साडेबाराचा लग्न मुहूर्त टळून गेल्यानंतरही रांजणी येथील वऱ्हाडी मंडळी लग्नमंडपात आलीच नाही. चार वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही वरासह कुणीच न पोचल्यामुळे वधू पित्याने वरपिता शामराव जाधव यांच्याशी संपर्क केला. आमचा मुलगा सकाळीच नंदीग्राम एक्सप्रेसने न सांगता मुंबईला निघून गेला. आता आम्ही लग्न सोहळ्यास येऊ शकत नाही, असे वर पित्याने सांगताच वधू पित्यास धक्का बसला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंत वधू पिता आपल्या मुलीसह तालुका ठाण्यात पोचले. या प्रकरणी वधू पित्याने नियोजित वर राहुल शामराव जाधव व त्याच्या आईवडिलांविरुद्ध पोलीसात तक्रार दिली. फसवणूक करून समाजात बदनामी केली. आर्थिक नुकसान केले, असे तक्रारीत नमूद आहे. प्राप्त तक्रारीवरून नियोजित वरासह त्याच्या आईवडिलांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या परगवानगीने तपास केला जाईल, असे पोनि भगीरथ देशमुख यांनी सांगितले.