कोरोनाबळींमध्ये तरुणांची संख्या वाढतेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:02 IST2021-04-10T04:02:01+5:302021-04-10T04:02:01+5:30
मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाचा नवीन स्ट्रेन मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ६० ...

कोरोनाबळींमध्ये तरुणांची संख्या वाढतेय
मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाचा नवीन स्ट्रेन मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वीपर्यंत कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू ६० ते ८५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा होत होता. धक्कादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत २९ ते ५० वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकट्या औरंगाबाद शहरात तब्बल चौदा जणांचा मृत्यू झाला. या मृत्यू सत्रामुळे आरोग्य यंत्रणाही पेचात पडली आहे.
१ मार्चनंतर कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी २०० ते २५० पॉझिटिव्ह रुग्ण, ५ ते ७ रुग्णांचा मृत्यू होत होता. ६ मार्चनंतर तर रुग्णसंख्या दहा पटीने वाढली. मृत्यू दररोज २५ ते ३० पर्यंत सुरू झाले. पॉझिटिव्ह आलेले ९० टक्के ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी ग्रस्त असायचे. त्यांच्यावर उपचार करताना आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत होती. ज्येष्ठांचे मृत्यू सत्र कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले नाही. आता त्यापेक्षाही आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पॉझिटिव्ह येत असलेल्या तरुणांना कोरोनारूपी राक्षस मृत्युच्या दाढेत ओढत आहे. ३ ते ८ एप्रिल या सहा दिवसांत अवघ्या औरंगाबाद शहरातील ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. २९ ते ५२ वयोगटांतील १६ जणांचा यात समावेश आहे. उपचाराला तरुणाई प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव आरोग्य यंत्रणेचा आहे.
मृत्युसत्र अतिशय गंभीर
घाटी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये काही दिवसांमध्ये अत्यंत कमी वय असलेल्या रुग्णांचा मृत्यू होतोय ही वस्तुस्थिती आहे. या मृत्यू मागची कारणे शोधण्याचे काम महापालिका आणि घाटी प्रशासन करीत आहे. तरुणाईचे मृत्युसत्र अतिशय गंभीर असून, काळजी घेणे हाच एकमेव उपाय सध्या आहे.
डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
असे आहे सहा दिवसांतील मृत्युसत्र
तारीख - वय - रुग्णाचा पत्ता
३ एप्रिल - ४४ - नित्यानंद पार्क, पडेगाव
४ - ५० पेक्षा खालील एकाही नागरिकाचा मृत्यू नाही.
५ - ३८ - जुना बाजार
५- ४० - एकतानगर
५- ४४ - चिकलठाणा
५- ४४ - हडको एन- ११
६ - ३१ - राजीव गांधीनगर
६ - ३९ - हरसूल
६- ५६ - भोईवाडा
६- ५२ - चिकलठाणा
७- २९- आसेफिया कॉलनी
७ ४० - नारेगाव
७ २५- एसटी कालनी, फाजलपुरा
७ ४१ - उस्मानपुरा
८ - ३५ - सातारा
८ ४५ - सिडको