आठवडाभरात टँकरची संख्या दुपटीने वाढली
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T00:50:14+5:302014-11-26T01:11:19+5:30
औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

आठवडाभरात टँकरची संख्या दुपटीने वाढली
औरंगाबाद : दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. परिणामी, टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात विभागातील टँकरची संख्या ३२ वरून वाढून ६२ झाली आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक २८ टँकर सुरू आहेत.
अत्यल्प पावसामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विभागातील बहुतांश लघु आणि मध्यम प्रकल्प रिकामेच आहेत. शिवाय, भूजल पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे आॅगस्टपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सद्य:स्थितीत औरंगाबादसह जालना नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. गेल्या आठवड्यात विभागात ३८ गावांना ३२ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. मात्र, चालू आठवड्यात आणखी २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. त्यामुळे टँकरची संख्या ३० ने वाढली आहे. सध्या विभागात ६० गावांना ६२ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विभागात पैठण तालुक्यात सर्वाधिक २३ टँकर सुरू आहेत.
विहीर अधिग्रहणाचा वेगही वाढला
टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरबरोबरच विहिरींचे अधिग्रहण केले जात आहे. प्रशासनातर्फे विभागातील हिंगोली वळता सातही जिल्ह्यांत विहिरी अधिग्रहित केल्या जात आहेत. टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत भर पडत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात विहीर अधिग्रहणाचा वेग वाढला आहे. मागील आठवड्यापर्यंत विभागात ७९ विहिरींचे अधिग्रहण झालेले होते. चालू आठवड्यात ही संख्या १२४ वर पोहोचली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५८ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.