टँकरची संख्या पन्नास टक्क्यांनी घटली !
By Admin | Updated: July 23, 2016 00:53 IST2016-07-23T00:42:44+5:302016-07-23T00:53:59+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३७.७ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांच्या पाणीपातळीमध्ये थोड्याबहुत प्रमाणात वाढ होवू लागल्यान

टँकरची संख्या पन्नास टक्क्यांनी घटली !
उस्मानाबाद : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३७.७ टक्के एवढा पाऊस झाला आहे. त्यामुळे जलस्त्रोतांच्या पाणीपातळीमध्ये थोड्याबहुत प्रमाणात वाढ होवू लागल्यान टंचाई निवारणार्थ राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची संख्याही कमी होवू लागली आहे. १० जूनपर्यंत जिल्हाभरातील टंचाईग्रस्त गावांना तब्बल ४२२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. टँकरची ही संख्या आता २०९ पर्यंत खाली आली आहे. अधिग्रहणांची संख्याही रोडावू लागली आहे.
जिल्ह्यात मागील तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती उद्भवत आाहे. यंदा सरासरीपेही अधिक पाऊस पडेल, असे भाकित हवामान खात्याने केले होते. परंतु, भाकिताप्रमाणे सध्या चित्र नाही. जून महिना सरत आला असतानाही जिल्ह्याचा काही भाग वगळता अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. रिमझीम स्वरूपाच्या पावसामुळे खरीप पिकांना फायदा होतो आहे. ज्या भागात दमदार पाऊस झालेला आहे, अशा अशा गावांतील टंचाईच्या उपाययोजना हाती कमी होवू लागल्या आहेत. १० जूनअखेर जिल्हाभरातील टंचाईग्रस्त गावांना सुमारे ४२२ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसामुळे टँकरची संख्या तब्बल पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे. आजघडीला जिल्हाभरा मिळून २०९ टँकर सुरू आहेत. दरम्यान, असेच चित्र अधिग्रहणांच्या बाबतीतही पहावयास मिळते. १० जूनअखेर १ हजार ४६६ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करून टंचाईग्रस्त गावांतील ग्रामस्थांची तहान भागविली जात होती. सध्या अधिग्रहणांची संख्याही १ हजार १०४ पर्यंत खाली आली आहे. भविष्यात दमदार पाऊस झाल्यानंतर ही संख्या आणखी कमी होईल, असे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्हाभरात मिळून ३७.२ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक ४३ टक्के हा तुळजापूर तालुक्यात पर्जन्यमान झाले. त्यानंतर उस्मानाबाद तालुक्यात २२.४ टक्के, उमरगा ३७.६ टक्के, लोहारा ३०.५ टक्के, कळंब १९.२ टक्के, भूम २७ टक्के आणि वाशी तालुक्यात ३०.१ टक्के एवढा पाऊस झाला आहे. झालेल्या पावसाची टक्केवारी पहाता अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही एकाही तालुक्याने पन्नासी ओलांडलेली नाही. असे असतानाही टँकरची संख्या एवढ्या झपाट्याने कमी कशी होवू लागली? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.