टँकरची संख्या घटली
By Admin | Updated: August 25, 2014 00:25 IST2014-08-24T23:59:39+5:302014-08-25T00:25:58+5:30
चालू आठवड्यात टँकरची संख्या २६ ने कमी झाली आहे.

टँकरची संख्या घटली
औरंगाबाद : आठवडाभरातील पावसामुळे जिल्ह्यातील काही गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दूर झाला आहे. त्यामुळे या गावात पाणीपुरवठा करणारे टँकर बंद करण्यात आले आहेत. परिणामी, चालू आठवड्यात टँकरची संख्या २६ ने कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या २९७ टँकरने २१९ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे.
पैठण तालुक्यातील २४ आणि सिल्लोड तालुक्यातील २, असे एकूण २६ टँकर कमी झाले आहेत. आतापर्यंत पावसाळा असूनही टँकरचा आलेख सतत वर चढत होता. त्यामुळे गेल्या आठवड्यात २३४ गावांना ३२३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता; परंतु गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पैठण आणि सिल्लोड तालुक्यांतील काही गावांमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला आहे. म्हणून प्रशासनाने या गावांतील पाणीपुरवठ्याचे टँकर बंद केले आहेत. सध्या जिल्ह्यातील चारशे गावांना टंचाईच्या झळा बसत आहेत. यापैकी सव्वादोनशे गावांना टँकरने, तर उर्वरित पावणेदोनशे गावांना अधिग्रहित विहिरींद्वारे पाणी पुरविले जात आहे.