हायमास्टची संख्या १०० पर्यंत
By Admin | Updated: December 20, 2015 23:56 IST2015-12-20T23:48:07+5:302015-12-20T23:56:32+5:30
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक चौकात हायमास्ट लावण्यासाठी चढाओढ सुरू आहे. नगरसेवकांच्या स्पर्धेमुळे अद्यापपर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांचे १०० पेक्षा जास्त हायमास्ट लावले आहेत.

हायमास्टची संख्या १०० पर्यंत
औरंगाबाद : शहरातील प्रत्येक चौकात हायमास्ट लावण्यासाठी चढाओढ सुरू आहे. नगरसेवकांच्या स्पर्धेमुळे अद्यापपर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांचे १०० पेक्षा जास्त हायमास्ट लावले आहेत. हायमास्टच्या विजेचे बिल दरमहा लाखो रुपयांमध्ये जात आहे. वाहतुकीचे कोणतेही निकष न पाळता आजपर्यंत हायमास्ट लावण्यात आले आहेत, हे विशेष.
शहरात सर्वप्रथम भडकलगेट, मध्यवर्ती बसस्थानक, टी. व्ही. सेंटर चौक, अशा वर्दळीच्या ठिकाणी प्रत्येकी दहा लाख रुपये किमतीचे मोठे उंच हायमास्ट लावण्यात आले. हळूहळू हायमास्टची संख्या वाढत जाऊन ३४ पर्यंत पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत लहान मोठे मिळून आणखी ७० हायमास्ट मनपाच्या विद्युत विभागातर्फे लावण्यात आले. १२ मीटर ते ३० मीटर उंच हायमास्टची किंमतही दोन लाखांपासून दहा लाखांपर्यंत आहे. एका हायमास्टवर किमान सहा मोठे दिवे असून, एक दिवा ४५० व्होल्टचा आहे.
हायमास्ट लावण्यासाठी मनपाकडे कोणतेच निकष नाहीत. मागणी केल्यास त्वरित मोठा दिवा लावण्यात येतो. मागील पाच वर्षांमध्ये नगरसेवकांनी नको तेथे दिवे लावले आहेत. आता नवनिर्वाचित नगरसेवकही चौकाचौकांत मोठे हायमास्ट लावण्यासाठी आग्रह धरत आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. एकीकडे वीज बचतीसाठी प्रशासन शहरात वेगवेगळ्या पद्धतीचे पथदिवे लावत आहे. दुसरीकडे एकानंतर एक हायमास्ट लावल्यास वीज बचतीचा उद्देश सफल होणार नाही. किती वर्दळीच्या ठिकाणी हायमास्ट लावावेत, कोणत्या चौकात हायमास्टची गरज आहे, याची तपासणी करूनच निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे.