औंढ्यात भाविकांची संख्या रोडावली
By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-28T23:47:54+5:302014-07-29T01:13:08+5:30
औंढा नागनाथ : येथील आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पेरणीमुळे गर्दी दिसून आली नाही. तरी पहिलाच श्रावण सोमवार असल्याने जवळपास ५० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले.
औंढ्यात भाविकांची संख्या रोडावली
औंढा नागनाथ : येथील आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी पेरणीमुळे गर्दी दिसून आली नाही. तरी पहिलाच श्रावण सोमवार असल्याने जवळपास ५० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले.
सोमवारी भाविकांनी हर हर महादेवाच्या जय घोष करीत गर्दी केली होती. रविवारच्या रात्रीपासूनच आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश व इतर राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. रात्री १२.४५ वाजता नागनाथाचा महाभिषेक खा. राजीव सातव, पत्नी डॉ. प्रज्ञा सातव, तहसीलदार श्याम मदनूरकर, विश्वस्त डॉ. विजय निलावार यांनी केला. नंतर रात्री १ वाजता भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
संस्थानच्या वतीने भाविकांसाठी सभामंडम टाकून त्यात बॅरेकेटस टाकले होते. पावसामुळे भाविक भिजू नयेत म्हणून टीनशेडचे बॅरकेटस बसविल्याने दर्शनासाठी सोयीचे झाले होते. कमी वेळेत दर्शन व्हावे म्हणून संस्थानने नियोजन केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. पोलिस अधीक्षक सुधीर दाभाडे यांनी दुपारी २.३० वाजता मंदिरास भेट देवून सुरक्षेचा आढावा घेतला.
या ठिकाणी डीवायएसपी नीलेश मोरे, सुनील रसाळ, पोनि ज्ञानोबा पुरी, जमादार शंकर इंगोले, नुरखाँ पठाण यांनी बंदोबस्त ठेवला होता. सध्या पेरणी सुरू असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या रोडावली असल्याचे सचिव दिलीप चव्हाण यांनी सांगितले. दिवसभरात केवळ ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले.
संस्थानच्या स्वयंसेवकास उपसचिव उत्तम देशमुख, विश्वस्त प्रा. साहेबराव देवकते, गणपत बांगर, व्यवस्थापक नीळकंठ देव, शरयू देव यांनी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
महसूल विभागाची बैठक
औंढा येथे देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यांना विविध सुविधा देण्यासंदर्भात महसूल विभागाने तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता बैठक घेतली.
गावामध्ये ठिकठिकाणी खड्डे बुजविणे, वीजपुरवठा सुरळीत करणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, आरोग्य सुविधा व औषधी पुरवठा करण्यासंदर्भात सूचना उपविभागीय अधिकार अनुराधा ढालकरी यांनी दिल्या.
यावेळी तहसीलदार श्याम मदनूरकर, सचिव दिलीप चव्हाण, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरिश दराडे, परिवहन नियंत्रक वामन पवार, तलाठी माणिक रोडगे आदींची उपस्थिती होती.