तक्रारदारांची संख्या वाढणार
By Admin | Updated: August 10, 2014 01:30 IST2014-08-10T00:20:27+5:302014-08-10T01:30:56+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोकांना दुप्प्पट-तिप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या आणखी वाढली आहे.

तक्रारदारांची संख्या वाढणार
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमधील लोकांना दुप्प्पट-तिप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदारांची संख्या आणखी वाढली आहे. दरम्यान, ‘सुपर पॉवर इनव्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा.लि. कंपनी’ चे चार एजंट फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक पाठविण्यात आले तरी आरोपी अजून सापडलेले नाहीत.
मागील २ वर्षापासून अनेकांना ‘सुपर पॉवर’ कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी विविध बनावट योजना सांगून त्यांना दुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून भरमसाठ पैसे गुंतवण्यास भाग पाडले. ही रक्कम जमा करून कंपनीचे बनावट व्हाऊचर व बँकेचे खोटे धनादेश देऊन लाखो रूपयांचंी फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत औंढा तालुक्यातील लाख येथील ८ जणांनी आपली सदर कंपनीकडून फसवणूक झाल्याची पोलिसांत तक्रार दिली आहे. लाख येथील विश्वनाथ दादाराव लोंढे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश रामभाऊ शिंदे (रा.लाख), दीपक केडू पारखे, दिव्या दीपक पारखे (दोघे रा.औरंगाबाद), विश्वनाथ बोचरे (रा.खरबी), संपत केदारलिंग वसू (रा.इंचा), नामदेव तुकाराम कऱ्हाळे (रा.डिग्रस कऱ्हाळे) यांच्याविरूध्द सहा दिवसांपुर्वीच बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुपर पॉवर इनव्हेस्टमेंट सेव्हिंग इंडिया प्रा.लि.चे संचालक असलेले दीपक पारखे, दिव्या पारखे यांना औरंगाबाद येथे यापुर्वीच अटक झाली आहे. त्यानंतर एजंट प्रकाश शिंदे, विश्वनाथ बोचरे, संपत वसू, नामदेव कऱ्हाळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय शिरडशहापूर, आखाडा बाळापूर परिसरातही या कंपनीने अनेकांना गंडविल्याचे समोर येत आहे. बाळापूर येथील एका वकिलही या कंपनीच्या जाळ्यात अडकला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकारे आर्थिक गुंतवणूक करून फसवल्या गेलेले अनेकजण दररोज पोलिसांकडे चकरा मारत आहेत. या संदर्भात बासंबा ठाण्याचे सपोनि सुधाकर आडे यांना विचारले असता, सुपर पॉवर कंपनीकडून अनेक जणांची फसवणूक झाली आहे. तशा तक्रारी जिल्हाभरातून येत असून त्याबाबतची कागदपत्रे पडताळून तक्रारी स्विकारल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
फरार आरोपी पोलिसांना सापडेनात