शासनाच्या तिजोरीवर डल्ला!
By Admin | Updated: November 17, 2015 00:28 IST2015-11-16T23:57:01+5:302015-11-17T00:28:58+5:30
गंगाराम आढाव , जालना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभाराचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. शिफारशीपेक्षा दहापटीने वर्कआर्डर दाखवून

शासनाच्या तिजोरीवर डल्ला!
गंगाराम आढाव , जालना
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अजब कारभाराचा फटका शासनाच्या तिजोरीला बसला आहे. शिफारशीपेक्षा दहापटीने वर्कआर्डर दाखवून त्याआधारे कामांची देयक काढून शासनाच्या तिजोरीवर राजरोसपणे डल्ला मारण्यात आला. तरीही संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी गप्पच आहेत.
चौकशी अहवालही शासनदरबारी न पाठविता तो विभागीय कार्यालयातच दडवून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे यासर्व प्रकारामागे सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते व गुत्तेदारांची मोठी साखळी कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. याप्रकरणाची तसेच अन्य कामांची सखोल चौकशी झाल्यास शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांचे पितळ उघडे पडेल.
जालना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी वरुन त्या कामांची चौकशी करण्यात आली होती. तसेच काही कामांची शिफारस पत्रे व वर्कआर्डरची पडताळणी करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक जालना यांनी केलेल्या दहा कामांच्या पडताळणीत कामांच्या शिफारस पत्रावरील रक्कमेच्या पाचपट रक्कमेचे वर्कआर्डर संबंधित गुत्तेदाराच्या एजन्सीला देण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यात वालसावंगी- पारध- पिंपळगाव रेणुकाई, दानापूर- भोकरदन या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिफारस पत्रावर २ लाखांची रक्कम असताना वर्कआर्डर ९ लाख ९८ हजार ३० रुपयांचे देण्यात आले. याच प्रमाणे फुलंब्री- तळेगाव राजूर रस्ता दुरुस्तीसाठी २ लाख ९५ हजारांचे काम असताना ९ लाख ९४ हजार १३३ रुपयांची वर्कआर्डर देण्यात आली. फुलंब्री ते राजूर रस्ता दुरुस्तीसाठी १ लाख ९५ हजारांची वर्कआर्डर ९ लाख ९६ हजार ४९६ रुपयांचे, सिल्लोड-भोकरदन - जाफराबाद रस्ता दुरुस्तीसाठी १ लाख ५० हजाराचे शिफारसपत्र वर्कआर्डर दिले. ९ लाख ९७ हजार १ रुपयांचे, भोकरदन येथील दिवाणी न्यायालय युरिनस ब्लॉकची दुरुस्तीचे शिफारसपत्र २ लाखांचे वर्कआर्डर दिले ९ लाख ९४ हजार ७७० रुपयांचे, भोकरदन पोलिस ठाण्यातील स्वच्छतागृहाची दुरुस्तीसाठी शिफारसपत्र २ लाखांचे वर्कआर्डर दिली. ४ लाख ९९ हजार ३२६ रुपयांचे, जिल्हा कारागृह ग्रेड १- अंतर्गत पेट्रोलिंग रोडसाठी १ लाख ९९ हजारांचे शिफारस पत्र असताना वर्क आर्डर ९ लाख ९६ हजार ९७९ रुपयांचे देण्यात आले. जालना नर्सिंग कॉलेज कॅम्प बोर्ड दुरुस्ती व फस्ट फलोअर आॅफ हॉस्टेल दुरुस्तीसाठी ५ लाखोचे शिफारसपत्र असताना १० लाखांची वर्कआर्डर देण्यात आली. महिला रुग्णालय जालना येथील वॉटर सप्लाय सेनेटरी अॅरेजमेंटचे ४ लाखांचे शिफारस पत्र असताना वर्कआर्डर ९ लाख ९९ हजार ५० रुपयांची देण्यात आले. विशेष म्हणजे ही सर्व कामे एकाच संस्थेला देण्यात आली,हे विशेष.!