न.प.कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By Admin | Updated: September 11, 2014 00:01 IST2014-09-10T23:52:56+5:302014-09-11T00:01:18+5:30

वसमत : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

N.P. employee's suicide attempt | न.प.कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

न.प.कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

वसमत : नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यातील एका कर्मचाऱ्याने बुधवारी अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकाराने न. प. वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वसमत न. प. मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सतत अनियमितता असल्याने कर्मचारी त्रस्त आहेत. गेल्या ३ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत आहेत. वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे हप्ते, विमा, गृहकर्जावरील व्याजाचा भूर्दंडही बसत आहे.
या प्रकाराने त्रस्त झालेल्या हरिश्चंद्र मुंदरे व माधव कुरपटवार या दोन कर्मचाऱ्यांनी बुधवारी न.प. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र ३ महिन्यांपासून थकलेले वेतन अदा करावे, अन्यथा ४ आक्टोबर रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. या कर्मचाऱ्यांनी हे निवेदन बुधवारी सकाळी ११.३० वाजता दिले होते.
सायंकाळी चारच्या सुमारास निवेदनकर्त्यांपैकी एक असलेल्या हरिश्चंद्र मुंदरे या कर्मचाऱ्याने न.प. कार्यालयात जावून वेतन मिळत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला व सोबत बाटलीत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतले. न.प. कार्यालयातच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
सदर कर्मचाऱ्यास उपमुख्याधिकारी मुजीबखान, उपअभियंता रत्नाकर अडसिरे, श्याम माळवटकर यांनी पकडले व त्यास शांत केले. दरम्यान, नगराध्यक्ष भगवान कुदाळे व अन्य सदस्य न.प.मध्ये पोहोचले. त्यांनी चर्चा करून तातडीने कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची सूचना केली.
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान कपात होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनियमितता होत असल्याचे वृत्त आहे. (वार्ताहर)

Web Title: N.P. employee's suicide attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.