न.प.ची लगीनघाई

By Admin | Updated: March 16, 2015 00:54 IST2015-03-16T00:31:16+5:302015-03-16T00:54:54+5:30

बीड : भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता नगर परिषदेने बलभीम चौक ते बिंदुसरा नदीपात्रापर्यंतच्या रस्ता कामास सुरुवात केली आहे. ज्या लोकांची या भागात जागा किंवा घर नाही

NP | न.प.ची लगीनघाई

न.प.ची लगीनघाई


बीड : भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता नगर परिषदेने बलभीम चौक ते बिंदुसरा नदीपात्रापर्यंतच्या रस्ता कामास सुरुवात केली आहे. ज्या लोकांची या भागात जागा किंवा घर नाही त्यांचा सत्कार करुन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. कायदेशीर मार्गाने प्रकरण न हाताळल्यास सदरील कामाविरोधात जवळपास पन्नास जण उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
विकास आराखड्यांतर्गत शहरातील बलभीम चौक ते बिंदुसरा नदीपात्रापर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू केले आहे. प्रस्तावित रस्ता ४० फुटांचा असल्याने दोन्ही बाजूच्या मालमत्ता पाडण्यात येणार होत्या. २७ जानेवारी २०१५ रोजी या भागातील नागरिकांना न.प.ने नोटीस बजावल्या होत्या. नोटीस मिळालेले नागरिक व्यंकट लाड व सय्यद हाफिजोद्दीन यांनी औरंगाबाद खंडपीठात रिटपिटीशन दाखल केली होती. त्यावर सुनावणी करत न्यायमूर्ती पी.आर. बोरा व आर.एम. बोर्डे यांनी आदेशात दिला की, पुढील न्यायालयीन आदेश येईपर्यंत याचिकाकर्त्यांवर कोणतीही कारवाई करु नये. हा निकाल त्यांनी १० फेब्रुवारी रोजी दिला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
प्रक्रियेला दिला फाटा
रस्ता रूंदीकरणाच्या कामाचा ठराव नगर परिषदेने घेणे आवश्यक असते. त्यानुसार जाहिरात द्यावी लागते. सिटी सर्व्हे मार्फत भूसंपादनाची मोजणी करावी लागते. त्यानंतर सर्व्हेची रक्कम प्रशासनास अदा करावी लागते. न.प.कडून नोटीस प्रक्रिया पूर्ण करुन एम.बी. रेकॉर्ड करावी लागते. एका निश्चित रकमेची तरतूद केल्यानंतर ज्यांची मालमत्ता बाधीत होणार आहे त्यांना १० ते २० टक्के रक्कम काम सुरु होण्यापुर्वीच अदा करावी लागते. पैसे वाटप करण्यापुर्वी ना हकरत प्रमाणपत्र द्यावे लागते. याशिवाय सर्वसाधारण सभा ठराव घेऊन भूसंपादन कायद्यान्वये सादर केलेल्या रस्त्याची जिल्हाधिकारी यांच्यामार्फत भूसंपादनाची किंमत कळवतात. त्या रकमेस तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात येते. तसेच सदर रक्कम शासनाच्या योजनेर्तंगत कर्ज व अनुदान स्वरुपात मागणी करण्यासाठी ही सभा सर्वानुमते मान्यता देते.
आमचा कामास विरोध नाही
सदर रस्तारुंदीकरणास आमचा विरोध नाही. परंतु संपादीत मालमत्तेचे व होणाऱ्या नुकसानीचे मोक्यावर मोजणी करुन तसेच मोजमापे घेऊन/ किंमती ठरविणे आवश्यक आहे. प्रक्रियेप्रमाणे काम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरोप बिनबुडाचे
नगर रचनाकार जैन म्हणाले, प्रथम पैसे देऊन मावेजा दिला जात नाही. भूसंपादन अधिनियमानुसार तसे कायद्यात कोठेही नमूद नाही. आमच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आहेत. ज्या लोकांचे सत्कार केले त्यांची जागा आहे की नाही, हे मला माहित नाही, कारण मी तिथे नव्हतो, आमचे तीन कर्मचारी तेथे होते, त्यांना विचारून सांगतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बलभीम चौक ते बिंदुसरा नदीपात्रापर्यंतच्या रस्ता कामादरम्यान दुकान, घरे, पाच मशीद व जैन मंदीर परिसराच्या मालमत्ता बाधित होणार आहेत. जवळपास १३२ मालमत्ताधारकांचा समावेश यात आहे. शुक्रवारपासून कामास सुरुवात झाली असल्याने अनेकांनी धसका घेतला आहे. आतापर्यंत केवळ एक ते दोन घरे पाडण्यात आली आहेत.

Web Title: NP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.