ग्रामपंचायतीत आता ‘पतिराज’
By Admin | Updated: June 26, 2017 00:52 IST2017-06-26T00:51:15+5:302017-06-26T00:52:26+5:30
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सदस्यांच्या पती व नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढला आहे.

ग्रामपंचायतीत आता ‘पतिराज’
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीच्या कारभारात महिला सदस्यांच्या पती व नातेवाईकांचा हस्तक्षेप वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात दोन महिला सदस्यांच्या पतीने सरपंच व उपसरपंचाच्या थेट खुर्चीवर अतिक्रमण केले. एवढेच नव्हे तर ते दोघे ग्रामपंचायतीवर आलेल्या मोर्चास सामोरे जाऊन मार्गदर्शनही करू लागल्याने मोर्चेकरी चांगलेच संतापले होते.
वाळूज गावातील जवानगर, भारतनगर, हिदायतनगर, अण्णा भाऊ साठेनगर, लायननगर, अविनाश कॉलनी आदी नागरी वसाहतींतील मूलभूत समस्या सुटत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. या वसाहतीत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. नाल्या व ड्रेनेजलाइन नसल्यामुळे सांडपाणी उघड्यावरून वाहते. सध्या पावसाळा सुरू असून, पावसाचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात जात असल्यामुळे सर्वत्र चिखलमय रस्ते झाले आहेत. या भागात नागरी सुविधा पुरविण्यात याव्या, यासाठी शुक्रवारी (दि.२३) एमआयएमच्या वतीने वाळूज शहराध्यक्ष संतोष दळवी, इरशाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
नागरिक आक्रमक झाल्यामुळे तसेच प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच अनिल साळवे व महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या पतींनी भारतनगर व इतर ठिकाणी भेटी देऊन सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.