आता महाविकास आघाडीचे लक्ष्य महापालिका
By | Updated: December 5, 2020 04:06 IST2020-12-05T04:06:36+5:302020-12-05T04:06:36+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीने पुढील वर्षी होणाऱ्या संभाव्य महापालिकेच्या ...

आता महाविकास आघाडीचे लक्ष्य महापालिका
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता महाविकास आघाडीने पुढील वर्षी होणाऱ्या संभाव्य महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. तिन्ही पक्ष एकत्रित येऊन महापालिका निवडणुकीसाठी काम करण्याची शक्यता समोर येत आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख डॉ. कल्याण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांनी पदवीधरच्या विजयानंतर माध्यमांशी बोलतांना महाविकास आघाडी यापुढे अभेद्य राहणार असल्याचा दावा केला.
डॉ. काळे म्हणाले, महाविकास आघाडीला राज्यात मतदारांनी स्वीकारले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवर सर्व नेते निर्णय घेतील.
शिवसेना नेते खैरे यांनी सांगितले, एकत्र लढल्यामुळे पदवीधरमध्ये विजय मिळाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमार्फतच सर्व निवडणुका लढण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक देखील सर्व मिळून एकत्रित लढणार आहोत. महापालिका देखील महाविकास आघाडीच्या ताब्यात येईल.
भाजपचा दावा असा
भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांनी सांगितले, पक्षाने अनेक चढ-उतार पाहिलेले आहेत. या निवडणुकीतून ज्या उणीवा राहिल्या त्या आगामी काळात भरून निघतील. येणारी महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा त्यांनी केला.