आता तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम मराठीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:05 IST2021-07-19T04:05:11+5:302021-07-19T04:05:11+5:30
विजय सरवदे औरंगाबाद : यंदापासून तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षासाठी मराठीतून अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने घेतला असून, मंडळाने त्यासंदर्भात शिक्षण ...

आता तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम मराठीतून
विजय सरवदे
औरंगाबाद : यंदापासून तंत्रनिकेतनच्या प्रथम वर्षासाठी मराठीतून अभ्यासक्रम राबविण्याचा निर्णय तंत्रशिक्षण मंडळाने घेतला असून, मंडळाने त्यासंदर्भात शिक्षण संस्थांकडून पर्याय मागवले आहेत. तथापि, पॉलिटेक्निक कॉलेजेस असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम मराठीतून सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तंत्रशिक्षण संचालनालयाने गेल्या वर्षी विधानसभेत ठेवला होता. विधानसभेची मान्यता मिळाल्यानंतर तंत्रशिक्षण मंडळाने निवडक प्राचार्यांची एक समिती गठित केली. त्या समितीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा अभ्यासक्रम इंग्रजीमधून, इंग्रजी-मराठी माध्यमातून ऐच्छिक स्वरूपात राबविण्याची शिफारस केली. या शिफारसी तंत्र शिक्षण मंडळाच्या विद्वत समितीनेही मान्य केल्या व या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना इंग्रजीबरोबर मराठी भाषेचा वापर करण्यास तसेच पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत मराठीतून उत्तरे लिहिण्याची मुभा दिली.
त्यानंतर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेत शैक्षणिक सामग्री विकसित करून अध्यापनाची प्रक्रिया मराठीतून करण्यास परवानगी दिली. तंत्रशिक्षण मंडळाच्या नियामक परिषदेने या सर्व बाबींचा विचार करून यंदापासून यापुढे दरवर्षी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता अध्यापनाच्या प्रक्रियेची अंमलबजावणी मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) भाषेतून राबविण्यास इच्छुक संस्थांकडून पर्याय मागविण्याची सूचना केली. त्यानुसार शिक्षण संस्थांना एका परिपत्रकाद्वारे यासंबंधी तसे हमीपत्र तंत्रशिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाकडे देणे बंधनकारक केले आहे.
चौकट.......
विद्यार्थिहिताचा निर्णय
पॉलिटेक्निक कॉलेजेस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय अवघड जात होता. त्यामुळे पाॅलिटेक्निकला प्रवेश मिळाल्यानंतरही अनेक विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडत होते. त्यामुळे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पॉलिटेक्निक कॉलेजेस असोसिएशनने पॉलिटेक्निकचा अभ्याक्रम मातृभाषेतून (मराठी) असावा, अशी मागणी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे केली होती. देशातील इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना उशिरा परवानगी मिळाली असली तरी हा निर्णय विद्यार्थिहिताचा आहे.