आता नेतृत्त्वाचा कस

By Admin | Updated: January 7, 2015 00:59 IST2015-01-07T00:49:27+5:302015-01-07T00:59:39+5:30

जालना : एकदा नव्हे दोनदा हुलकावणी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपविली.

Now the strength of the leadership | आता नेतृत्त्वाचा कस

आता नेतृत्त्वाचा कस


जालना : एकदा नव्हे दोनदा हुलकावणी दिल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी अखेर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची धूरा सोपविली.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्त्व दिल्यापाठोपाठ दानवे यांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद पक्षश्रेष्ठींनी सोपविल्याने जिल्ह्यासह मराठवाडावासीयांच्या इच्छा, आकांक्षा उंचावल्या आहेत.
मूळ भोकरदन तालुक्यातील पळसखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले खा. दानवे यांनी १९७६ साली आपल्याच गावच्या सरपंचपदी विराजमान होत राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जवखेडा गण पं.स. सदस्य, १९८१ साली ते भोकरदन पं.स. सभापतीपदी विराजमान झाले. १९९० ते ९९ या कार्यकाळात ते भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे दोन टर्म आमदार राहिले.
१९९९ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढविली. तेव्हापासून आजवर चारही लोकसभा निवडणुकांमधून त्यांनी विजय मिळविला. विशेषत: गेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊन ते दोन लाख एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने लोकसभेत पोहोचले. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींद्वारे त्यांच्या या उत्तुंग यशाची दखल घेतली जाईल, हे स्पष्ट झाले होते. त्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात दानवे यांचा पहिल्याच टप्प्यात राज्यमंत्री म्हणून समावेश करीत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या निष्ठेसह कार्याची पावतीच दिली.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून दानवे हे राज्याच्या राजकारणात पदार्पण करणार, अशी चर्चा सुरू झाली. विशेषत: राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या. तेव्हा पक्षश्रेष्ठींचा कोणताही आदेश आपण स्वीकारू, असे विधान करीत दानवे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भात संकेत दिले होते. त्याप्रमाणे मंगळवारी त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
दानवे यांचा हा निर्णय सर्वार्थाने राजकीय क्षेत्रात दुरोगामी परिणाम करणारा ठरणार आहे. सत्तारूढ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांच्या खांद्यावरील ही जबाबदारी सर्वार्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विशेषत: राष्ट्रीय स्तरावरील श्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीने दानवे यांना राष्ट्रीय व प्रदेश पातळीवरील श्रेष्ठींच्या संघटनात्मक दृष्ट्या आशा, अपेक्षांची पूर्तता करावी लागणार आहे. तसेच सरकार व संघटनेत समन्वय राखावे लागणार आहे. राज्यात भाजपा-सेना युतीचे सरकार असल्याने जिल्ह्यातील केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न तातडीने सुटतील. तसेच राज्य शासनाकडे रेंगाळलेल्या अनेक योजनाही मार्गी लागतील, असा आशावाद कार्यकर्त्यांप्रमाणेच जनतेतून व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)४
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याप्रमाणे दानवे यांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून आपल्या सात महिन्यांच्या कार्यकाळात ड्रायपोर्ट उभारणीसह अन्य महत्त्वाकांक्षी योजना विशेषत: भोकरदन-जालना रस्त्याच्या कामांसह इतर कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यासाठी प्रयत्नांना सुरूवात केली.

Web Title: Now the strength of the leadership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.