आता उरल्या केवळ आठवणीच
By Admin | Updated: June 4, 2014 01:33 IST2014-06-04T01:13:58+5:302014-06-04T01:33:58+5:30
जालना : बीड जिल्ह्याच्या सीमेवरील जालना जिल्हावासियांचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्याबरोबरचे वर्षानुवर्षापासूनचे ऋणानुबंध अखेर नियतीने दुरावले...

आता उरल्या केवळ आठवणीच
जालना : बीड जिल्ह्याच्या सीमेवरील जालना जिल्हावासियांचे ज्येष्ठ नेते गोपिनाथ मुंडे यांच्याबरोबरचे वर्षानुवर्षापासूनचे ऋणानुबंध अखेर नियतीने दुरावले... ज्येष्ठ नेते मुंडे यांचे जालना जिल्हावासियांशी पूर्वापारपासून नातेसंबंध. विशेषत: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पाठोपाठ जनसंघ व भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांचा या जिल्ह्याशी कायम संपर्क होता. ज्येष्ठ नेते मुंडे, स्व. प्रमोद महाजन या दोघांचे शहरासह जिल्ह्यातील अनेक कुटुंबांशी कायम सख्य, ऋणानुबंध होते. त्या काळातील, विशेषत: चळवळीतील आठवणी आजही काही कुटुंबिय आवर्जून सांगत असतात. मराठवाडा विकास आंदोलनातीलही त्या दोघांचे सहकारीही संघर्षाच्या त्या आठवणी ताज्या ठेवत आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने पूर्णत: भारावलेल्या त्या दोघांचे या जिल्ह्यात संघ परिवाराव्यतिरिक्त समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणीच्या कार्यकर्त्यांसह कुटुंबियांबरोबरचा जिव्हाळाही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या जिल्ह्यातील छोट्या असो वा मोठ्या प्रत्येक निवडणुकीत, पक्ष संघटनेत मुंडे यांची सक्रिय भूमिका राहिली. विशेषत: १९७७ पासून नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मुंडे यांचा मोठा प्रभाव राहिला. त्यामुळेच का होईना; या जिल्ह्यात पक्ष संघटनात्मक बांधणीसह सत्तेत पक्षाने गरूडझेप घेतली. विशेषत: एकापाठोपाठ एक लोकसभा निवडणुकीत नेहमीच मोठा विजय मिळवीत पक्षाने या जिल्ह्यात भक्कम असा पाया रोवला. भाजपाचा बालेकिल्ला म्हणून जालना नकाशावर राहिला. मुंडे यांचेच योगदान हे त्यात कारणीभूत होते, हे निश्चित. माजी खा. पुंडलिक हरी दानवे व माजी खा. उत्तमसिंह पवार या दोघांनी दोनदा विजय मिळविला. पाठोपाठ विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही ओळीने चारदा विजय मिळविला. या तिघाही पुढार्यांच्या विजयात मुंडे यांचाच मोठा वाटा होता. त्यामुळेच या जिल्ह्याशी मुंडे यांचे नाते आगळे ठरले. गेल्या दोन वर्षांपूर्वी या जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्या दरम्यान, मुंडे यांनीच सर्वप्रथम या जिल्ह्यात धाव घेतली. दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. शेतकर्यांबरोबर हितगुज केले. त्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासमवेतही ते दौर्यावर आले होते. त्यावेळीही आडवळणावरील अर्धा डझन गावांना या दोघांनी भेटी दिल्या. सर्वसामान्य शेतकर्यांबरोबर संवाद साधला. त्यांच्यासमवेत भोजनही केले. विशेष म्हणजे संसदेत जालना जिल्ह्यातील दुष्काळी चित्राविषयी आवाज उठविला. तेथूनच जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांना मोठा वेग आला. गेल्या सहा-आठ महिन्यात मुंडे हे या जिल्ह्यात किमान चार वेळा धावता दौरा करून गेले. देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या स्थलांतर सोहळ्या पाठोपाठ, एका रूग्णालयाच्या उद्घाटनास ते आवर्जून उपस्थित होते. अलीकडे म्हणजे गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंडे यांनी खा. रावसाहेब दानवे यांच्या निवडणूक प्रचारार्थ अंबडला २० एप्रिल रोजी हजेरी लावून जाहीर सभा घेतली. तो दौरा अन् ती सभा शेवटची ठरली. (प्रतिनिधी) १९६७-६८ मध्ये विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून प्र.गो. महाजन हे उमेदवार असताना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, जयसिंगराव गायकवाड यांच्यासमवेत बसून येथील जुन्या कार्यकर्त्यांनी पोलिंग चिठ्ठया लिहिण्याचे काम केले, अशा आठवणी काहीजण सांगतात. मुंडे यांचा विनोदी स्वभाव, हसत खेळत मार्गदर्शन करणे कार्यकर्त्यांना वेड लावून जाणारेच होते. भाजपा-शिवसेना युतीअंतर्गत कोणतीही समस्या उदभवली किंवा काही गैरसमज निर्माण झाले की गोपीनाथ मुंडे जालन्यात धावून येत. सर्वांशी चर्चा करून निर्माण झालेल्या समस्येवर मात करत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये मुंडे यांचा शब्द अंतिम मानला जात होता. शहरातील उद्योजकांशीही त्यांचे सौख्याचे संबंध होते.