आता सकाळी आणि सायंकाळी ‘नो’ पावती
By Admin | Updated: July 30, 2016 01:00 IST2016-07-30T00:51:26+5:302016-07-30T01:00:38+5:30
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर वाहतूक कोंडी होत असते. तांत्रिक कारणांमुळे सिग्नल खराब झाल्यास वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते.

आता सकाळी आणि सायंकाळी ‘नो’ पावती
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवर वाहतूक कोंडी होत असते. तांत्रिक कारणांमुळे सिग्नल खराब झाल्यास वाहतुकीचा वेग मंदावतो आणि वाहतूक कोंडी होते. अशा वेळी जर वाहतूक पोलीस नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना पावत्या देत बसले तर वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. ही बाब लक्षात घेऊन यापुढे सकाळी आणि सायंकाळी नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना दंडाच्या पावत्या देऊ नका, त्यांच्या वाहनांचे नंबर केवळ लिहून ठेवा, असे आदेश पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.
जालना रोडसह शहरातील विविध चौक आणि अन्य रस्त्यांवर कोठे ना कोठे वाहतुकीची कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली. गुरुवारी पोलीस आयुक्त कार्यालयात शहर, छावणी, वाळूज आणि सिडको वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले की, जालना रोडवरील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. या वाहतूक कोंडीला चौकाचौकांतील सदोष वाहतूक सिग्नलही जबाबदार आहेत. सिग्नलचे टायमिंग चुकलेले आहेत. ही बाब महानगरपालिक ा आयुक्त बकोरिया यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. शिवाय वाहतूक पोलीस हे नियम तोडून पळणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात व्यस्त असतात. विशेषत: सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ६ ते ८ पर्यंत जालना रोडवरील वाहनांची संख्या अधिक असते. अशा वेळी वाहतूक पोलिसांनी केवळ वाहतूक नियमन करण्याकडेच लक्ष द्यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत नियम तोडून पळणाऱ्या वाहनाचा नंबर लिहून ठेवावा, अथवा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचे सूचित करण्यात आल्याचे आयुकत म्हणाले.
जालना रोडवरील ११ चौकांत प्रत्येकी ८ पोलीस
जालना रोडवरील नगरनाका ते मुकुंदवाडीदरम्यान ११ वाहतूक चौक आहेत. या चौकातील प्रत्येक सिग्नलवर आता प्रत्येकी ६ ते ८ वाहतूक पोलीस तैनात केले जाणार आहेत. तांत्रिक कारणांमुळे सिग्नल खराब झाला अथवा त्याचे टायमिंग चुकल्याचे लक्षात येताच वाहतूक पोलिसांनी तात्काळ स्वत: हाताने वाहतूक नियमन करावे, अशा सूचना देण्यात आल्या.
सामंजस्याने वागा...
चार दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या लोकांविरोधात आम्ही कठोर कारवाई केली. शिवाय यापुढे हेल्मेटसक्ती, ट्रीपल सीट अथवा विचित्र नंबर प्लेट असलेल्या वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी वाहन चालकांसोबत समजूतदारपणाने वागावे, अशा सूचना देण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. शिवाय पोलिसांसोबत अरेरावी करणाऱ्यांविरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असून, हेल्मेटसक्तीची मोहीम सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.