आता बाजार समितीचा कारभार आॅनलाईन...!
By Admin | Updated: March 4, 2017 00:22 IST2017-03-04T00:22:04+5:302017-03-04T00:22:36+5:30
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आता पूर्णपणे आॅनलाईन होणार असून, संपूर्ण कार्यालयाची पेपरलेस होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे

आता बाजार समितीचा कारभार आॅनलाईन...!
जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आता पूर्णपणे आॅनलाईन होणार असून, संपूर्ण कार्यालयाची पेपरलेस होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत मंडी आॅनलाईनवर सर्व अपडेटस शेतकऱ्यांसह नागरिकांना मिळू शकणार आहे.
शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल दिवसेंदिवस वाढतच आहे. शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कामकाज अधिकाधिक संगणकीय व्हावे, या दृष्टीने राज्य शासनाचे प्रयत्न असून, त्याच दिशेने जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सुरू झाली आहे. बाजार समितीतील सर्व माहिती व शेतमालाचे दर या संकेतस्थळावर झळकणार आहेत. त्यामुळे एका क्लिकवर याबाबतची माहिती जगभरात कुठेही बसून मिळू शकणार आहे. यासाठी राज्य शासनाने बाजार समिती प्रशासनाला जवळपास २ कोटी रुपये खर्चाचे हार्डवेअर आणि एक कोटी रुपये खर्चाचे सॉफटवेअर देण्यात येणार आहे. याबाबतचे कामकाज सुरु झाले असून, येत्या काही दिवसांत ते पूर्णत्वास जाईल, असा विश्वास समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार या संकेतस्थळावर जालना जिल्ह्यातील शेतमालाचे भावही आॅनलाईन दिसू शकणार आहेत.
आतापर्यंत बाजार समितीच्या कार्यालयात विविध विभागांत पावती बुक यासह विविध प्रकारचे दस्तावेज पडलेले दिसत असत. संगणकीकरणानंतर हे कार्यालय पेपरलेस होणार आहे. तसेच कारभारातही सुसूत्रता व पारदर्शकता येणार आहे. आॅनलाईन सेवेमुळे कुठलीही माहिती शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे.