आता लक्ष माघारीकडे
By Admin | Updated: September 29, 2014 00:38 IST2014-09-29T00:12:07+5:302014-09-29T00:38:15+5:30
जालना : राज्यात युती आणि आघाडीत झालेल्या फुटीनंतर निवडणूक रिंगणातील प्रबळ उमेदवारांची संख्या वाढल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूक चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी होत आहे.

आता लक्ष माघारीकडे
जालना : राज्यात युती आणि आघाडीत झालेल्या फुटीनंतर निवडणूक रिंगणातील प्रबळ उमेदवारांची संख्या वाढल्याने बहुतांश ठिकाणी निवडणूक चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी होत आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही राजकीय पक्षातील मंडळींनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे आता १ आॅक्टोबरपर्यंत माघार कोण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पार्टी यासह अन्य काही पक्षांचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये काही पक्षांना उमेदवार शोधावे लागल्याने अन्य पक्षातील नाराज उमेदवाराला आपल्या पक्षात बोलावून नेतेमंडळींनी त्यांना उमेदवारीची संधी दिली आहे.
युती व आघाडीच्या फुटीपूर्वी काही उमेदवारांनी आपल्या विजयाची गणिते लावताना ठराविक मतांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले. परंतु या फुटीनंतर हे गणित बिघडले.
आता पुन्हा नव्याने गणित मांडत उद्दिष्टाचा आकडा कमी झाला असला तरी मित्रपक्षाची साथ आता मिळणार नसल्याने ही आकडेवारी गाठणे देखील काहींना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.
प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली असून बंड केलेल्या उमेदवारांची समजूत काढून त्यांच्या माघारीचाही प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)