गावपातळीवर भरणार आता जनता दरबार
By Admin | Updated: July 1, 2017 00:26 IST2017-07-01T00:23:12+5:302017-07-01T00:26:02+5:30
नांदेड: गेल्या अनेक वर्षांचा मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढायचा असून त्यासाठी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेवर विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे़

गावपातळीवर भरणार आता जनता दरबार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: गेल्या अनेक वर्षांचा मराठवाड्याचा अनुशेष भरुन काढायचा असून त्यासाठी वीज ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेवर विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे़ जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्या असून त्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे़ तसेच यापुढील काळात गावपातळीवर शाखा अभियंत्यांनी प्रत्येक वीजग्राहकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात़ त्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करावे अशा सूचना दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़
बावनकुळे म्हणाले, महापारेषणला सक्षम करण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यात ३०७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत़ आता महावितरणकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ त्यामध्ये शहरात सुरक्षित वीजपुरवठ्यासाठी ४१ कोटी, कृषी पंपासाठी ५६ कोटी अशाप्रकारे जिल्हाभरात महावितरणसाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़
शेतकऱ्यांसाठी कृषी सौर वाहिनी सुरु करण्यात येणार आहे़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत़ शाळा डिजिटल करण्याच्या अभियानात या शाळांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे़ त्याचबरोबर कंत्राटदरांची एकाधिकारशाही मोडून काढून काढण्यासाठी बी. ई. इलेक्ट्रीकल या विषयातील विद्यार्थ्यांची नोंदणी करुन १५ लाखांपर्यंतची कामे त्यांना देण्यात यावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत़ मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा एचआरए बंद करण्यात येणार आहे़ रिक्त असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या जागाही लवकरच भरण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले़
तत्पूर्वी झालेल्या जनता दरबारात ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली़