आता फक्त अंधारात बैठका
By Admin | Updated: October 14, 2014 00:35 IST2014-10-13T22:49:13+5:302014-10-14T00:35:13+5:30
बीड : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंड झाली़ फेरी, सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटी यातून उडालेला प्रचाराचा धुराळा अखेर जमिनीवर टेकला़

आता फक्त अंधारात बैठका
बीड : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंड झाली़ फेरी, सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटी यातून उडालेला प्रचाराचा धुराळा अखेर जमिनीवर टेकला़ आता फक्त अंधार बैठका व गृह भेटी होणार आहेत़ सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने राजकीय पक्षांसह अपक्षांनी फेरी, सभा घेऊन शेवटपर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला़
जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी डझनभर उमेदवार आखाड्यात आहेत़ विधानसभेच्या सहा जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये लढाई आहे़ मागील १५ दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवली होती़ युती-आघाडीच्या फाटाफुटीने पहिल्यांदाच सर्व पक्ष स्वतंत्रपणे जनतेसमोर गेले़ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे या राजकीय पक्षांच्या गर्दीत अपक्षही मागे नव्हते़ लोकसभा निवडणुकीत भाजपा विरूध्द काँग्रेस असा थेट सामना रंगला आहे़
विधानसभा निवडणुकीत मात्र बहुरंगी लढती होत आहेत़ मतदारराजा कोणाला संधी देतो आणि कोणाला घराचा रस्ता दाखवतो याचा फैसला बुधवारी होणार आहे़ जिल्ह्यातील २१६५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे़ सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावल्या़ मात्र संपूर्ण दिवस उमेदवारांनी प्रचार फेरी, बैठका, सभांवर भर दिला़ शेवटच्या क्षणापर्यंत पोहचण्याची संधी उमेदवारांनी सोडली नाही़ त्यामुळे प्रचाराने संपूर्ण जिल्हा अक्षरश: ढवळून निघाला़ (प्रतिनिधी)