आता आशा वर्कर करणार समुपदेशन
By Admin | Updated: December 16, 2015 23:14 IST2015-12-16T23:04:16+5:302015-12-16T23:14:02+5:30
इलियास शेख, कळमनुरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली

आता आशा वर्कर करणार समुपदेशन
इलियास शेख, कळमनुरी
प्रेरणा प्रकल्प शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आता गावातील आशा वर्कर शेतकऱ्यांना समुपदेशन करणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र कत्रुवार यांनी दिली.
सततची नापिकी होत असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आता आरोग्य विभाग सरसावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा रोखाव्यात याबाबत तालुक्यातील १९५ आशा वर्करला तालुकास्तरावर २८ व ३० नोव्हेंबर रोजी कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक आशा वर्कर त्यांच्या गावातील शेतकऱ्यांचा सर्वे करत आहेत. प्रत्येक आशा वर्करला सर्वेसाठी २५० घरे दिली आहेत. शेतकरी कोणत्या कारणाने आत्महत्या करीत आहे, त्याची कारणे शोधणार आहेत. त्यात नापिकी, व्यसन, गंभीर आजार, मुला-मुलींचे लग्न आदी कारणे राहणार आहेत. शेतकऱ्यांना नैराश्य कशामुळे आले, याची कारणे आशा वर्कर शोधून काढणार आहेत. नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन, गंभीर कारण असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे समुपदेशनासाठी संदर्भित करण्यात येणार आहे. सौम्य नैराश्य असेल तर आशा वर्करच समुपदेशन करणार आहेत. मध्यम नैराश्य असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. मात्र तीव्र नैराश्य असेल तर जिल्हा आरोग्य कार्यालयाकडे पाठविल्या जाणार आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन करायचे असेल तर टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करुन दिला आहे. तेथून थेट मानसोपचार तज्ज्ञांद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केल्या जाणार आहे.