आता आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By Admin | Updated: July 10, 2014 00:43 IST2014-07-10T00:12:20+5:302014-07-10T00:43:13+5:30
परभणी : राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत़

आता आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात
परभणी : राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या तयारीत आहेत़ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला़
डॉ़ खानंदे समितीच्या अहवालानुसार कारवाई करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुट्या दूर कराव्यात, हिवताप विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे बदलीचे अधिकार सहाय्यक संचालकांना द्यावेत, महाराष्ट्र विकास श्रेणी पदोन्नती देण्यासाठी आरोग्य पर्यवेक्षकांच्या ज्येष्ठता याद्या तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना द्यावेत, अर्धवेळ स्त्री परिचारिकांना किमान वेतनानुसार १० हजार रुपये देण्यात यावेत, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांप्रमाणे शासन सेवेत सामावून घ्यावे, एनआरएचएम अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे व सर्व सेवा सुविधा लागू कराव्यात, आरोग्य विभागातील बंध पत्रित आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित कराव्यात, औषध निर्माण अधिकाऱ्यांना केंद्राप्रमाणे वेतन श्रेणी द्यावी आदी ११ मागण्यांसाठी हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत़
एकूण तीन टप्प्यामध्ये आंदोलन होणार असल्याचे संघटनेचे विभागीय अध्यक्षा मनोरमा सोनार, जिल्हाध्यक्ष कृष्णा साळवे, कार्यकारी अध्यक्ष सुधाकर धायडे आणि जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश नवले यांनी कळविले आहे़ (प्रतिनिधी)
तीन टप्प्यांत आंदोलन
आपल्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्य जि़ प़ आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आंदोलन करणार आहे़ १४ जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ १६ जुलैपासून राज्यस्तरीय पदाधिकारी व कर्मचारी मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत तर २१ जुलैपासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात बेमुदत काम बंद आंदोलन केले जाणार आहे़
जि़ प़ तील आरोग्य कर्मचाऱ्यांवर सातत्याने अन्याय होत आहे़ शासनस्तरावर अनेक बैठका झाल्या, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास विभागाचे सचिव, आरोग्य सचिव यांना वेळोवेळी निवेदने देऊन समित्या नेमल्या़ परंतु, आरोग्य विभागाचे प्रमुख संचालक व त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत़ साधा प्रस्ताव दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा शासनस्तरावर केला नाही़, असा संघटनेचा आरोप आहे़