आता ‘सरसकट’च्या निकषाकडे डोळे
By Admin | Updated: June 13, 2017 00:56 IST2017-06-13T00:54:58+5:302017-06-13T00:56:34+5:30
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८३ अल्प, अत्यल्प खातेदारांना होणार हे निश्चित आहे

आता ‘सरसकट’च्या निकषाकडे डोळे
सतीश जोशी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचा फायदा बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अखत्यारीतील १ लाख ३६ हजार ४८३ अल्प, अत्यल्प खातेदारांना होणार हे निश्चित आहे. सरसकट कर्जमाफीला तत्वत: मान्यता दिली असली तरी त्याचे निकष निश्चित नाहीत. जिल्ह्यात पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकरी खातेदारांची संख्या ३० हजार ३६४ इतकी असून या खात्यावरील कर्जाचा बोजा जवळपास १८२ कोटी इतका आहे. या खातेदारांचे डोळे आता कर्जमाफीच्या निकषाकडे लागले आहे.
बँकेच्या अत्यल्प, अल्प आणि बहुभूधारक शेतकरी खातेदारांची एकूण संख्या १ लाख ६७ हजार ६०८ इतकी असून कर्जाचा बोजा जवळपास ६२१ कोटी १४ लाख रुपयांचा आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने शासनास ३१ मार्च २०१७ रोजी पर्यंतची आकडेवारी पाठविली, त्यानुसार या कर्जमाफीचा फायदा वरील शेतकऱ्यांना होईल असे वाटते. शेतकरी संपामुळे सुकाणू समितीसोबत झालेल्या चर्चेनंतर सरसकट कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता दिली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात परळी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारकांचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आता लगेचच होणार आहे. बीड जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारकांची संख्या आणि त्यांच्यावरील कर्जाचा आढावा घेतला असता वरीलप्रमाणे माहिती मिळाली. हे खातेदार फक्त डीसीसीच्या अखत्यारीतील आहेत.