आता अंगणवाड्यांमध्येही इंग्रजीचे धडे
By Admin | Updated: May 12, 2015 00:55 IST2015-05-12T00:43:52+5:302015-05-12T00:55:54+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्यांनी कात टाकायला सुरुवात केली आहे.

आता अंगणवाड्यांमध्येही इंग्रजीचे धडे
औरंगाबाद : जिल्ह्यातील अंगणवाड्यांनी कात टाकायला सुरुवात केली आहे. जनसामान्यांमध्ये असलेले इंग्रजीचे फॅड लक्षात घेऊन यापुढे अंगणवाड्यांमध्येही चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने पहिल्या टप्प्यात १२ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला असून, अलीकडे पुन्हा ३ कोटी ५५ लाख रुपयांचा पुनर्विलोकन निधी मंजूर केला आहे.
एकूण १५ कोटी ८० लाख रुपये खर्चून वर्षभरात २६४ अंगणवाड्यांसाठी सुसज्ज इमारती उभारल्या जाणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी दिली.
यासंदर्भात कदम म्हणाले की, अंगणवाड्या केवळ पोषण आहार देण्यासाठीच असतात, ही संकल्पना आता बदलली आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून बालक, गरोदर महिलांना पूरक पोषण आहार तर दिलाच जातो, शिवाय त्याबरोबरच किशोरी मुलींमध्येही आरोग्याविषयीही जागृती केली जाते. अंगणवाड्यांमध्ये कार्यरत सेविकांची नियुक्ती करताना मागील वर्षापासून किमान दहावी उत्तीर्णतेची अट शासनाने घालून दिली आहे.
ज्यामुळे अंगणवाड्यांमध्ये दाखल मुलांना इंग्रजीची मुळाक्षरे शिकवली जातील. सध्या इंग्रजी शाळांचे फॅड आलेले आहे. त्यामुळे अंगणवाड्यांतील मुलांनाही इंग्रजी मुळाक्षरांची ओळख होईल.
जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीचे वितरण पंचायत समिती स्तरावर करण्यात आलेले आहे. पंचायत समित्या या ग्रामंपचायतीमार्फत अंगणवाडी इमारतींचे बांधकाम करून घेतील.
जिल्ह्यामध्ये सध्या ३,१४० अंगणवाड्या असून यापैकी १,८५० अंगणवाड्यांसाठी स्वतंत्र इमारत आहे. १,२९० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नाही. प्राप्त निधीतून प्रती इमारत ६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार असून, २६४ अंगणवाड्यांच्या इमारती वर्षभरात उभारल्या जातील.