आता लातुरातील वितरण व्यवस्था मजबूत करावी

By Admin | Updated: April 16, 2016 00:12 IST2016-04-15T23:45:12+5:302016-04-16T00:12:00+5:30

लातूर : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होतोय आणि आता माकणीहून पाणी येतेय, पण शहरात मात्र त्याचा पुरवठा विस्कळीत आहे,

Now the distribution system of the plant should be strengthened | आता लातुरातील वितरण व्यवस्था मजबूत करावी

आता लातुरातील वितरण व्यवस्था मजबूत करावी

महसूलमंत्र्यांच्या मनपा आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना : महापौर बरळले, नळ योजनेत गळती नाही, मीडिया खोटे सांगते
लातूर : लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा होतोय आणि आता माकणीहून पाणी येतेय, पण शहरात मात्र त्याचा पुरवठा विस्कळीत आहे, यावर बोट ठेवीत महसूल आणि मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी मनपा आणि जिल्हाधिकाऱ्यांना वितरण व्यवस्थेत लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
शुक्रवारी आढावा बैठकीनंतर शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते वितरणाच्या मुद्यावर बोलत होते. ते म्हणाले की, आतापर्यंत आम्ही लातूर शहरात पाणी आणायची चिंता करीत होतो. कारण पाणीच नव्हते आणि आणणे हाच मुख्य मुद्दा होता. आता पाणी लातूर शहरापर्यंत आणले आहे. आणलेले पाणी इथून वाटायचे कसे ? हा पहिला प्रश्न आम्ही सोडविला. आता दुसरा प्रश्न वितरणाचा आहे. नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये गळती असल्याने नळाने पाणी देणे अशक्य आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी टँकरने पुरवठा करण्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हा प्रशासनाचे केले कौतुक !
जिल्हा प्रशासनाने रेल्वेच्या पाण्याबाबत केलेल्या कामाचे महसूलमंत्री खडसे यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, इतक्या कमी दिवसामध्ये प्रशासनाने यंत्रणा उभारली हे कौतुकास्पद आहे. (प्रतिनिधी)
महापौर बरळले : गळती असल्याचे मीडिया खोटे सांगतेय !
महसूलमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये लातूरचे महापौर अख्तर शेख यांनी आपल्या शहराची नळ पाणीपुरवठा योजना समृध्द असल्याचे सांगत गळतीचे खापर मीडियावर फोडले. शहरात कुठेही लिकेज नाहीत की पाणी वाया जात नाही. मीडिया चुकीचे दाखवित असल्याचा दावा केला. याची सावरासारव करताना खुद्द महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच ‘तुमच्या माझ्या कुणाच्याही गावात गेले तर नळाच्या पाण्याला गळत्या असतात’ असे सांगून टँकरच्या पाण्यावर ठाम राहीले. शिवाय जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना वितरणावर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही केल्या.
उदगीरला टंचाई असल्यास रेल्वेचाही विचार करु
आढावा बैठकीत आ. सुधाकर भालेराव यांनी उदगीरची पाणीटंचाईही गंभीर असल्याचे सांगून रेल्वे ट्रॅक असल्याने या शहराला सुध्दा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. यावर पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले की, उदगीर शहराला पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे कानावर आले आहे. याही शहराला रेल्वेने पाणी द्यावे, अशी मागणी झाली आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येईल. आवश्यकता वाटली तर विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
लातुरात झाली लातूर, बीड आणि उस्मानाबादच्या अधिकाऱ्यांची बैठक...
लातुर दौऱ्यावर असलेल्या महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लातूर, बीड आणि उस्मानाबादच्या अधिकाऱ्यांची लातूरच्या शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक घेतली. यावेळी खा. सुनील गायकवाड, आ. अमित देशमुख, आ. सुधाकर भालेराव, आ. संभाजीराव पाटील-निलंगेकर, आ. त्र्यंबकनाना भिसे, विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, महापौर अख्तर शेख, जि. प. अध्यक्षा प्रतिभाताई पाटील, लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेस्टेशनवरील फिडरचे खडसेंच्या हस्ते पूजन...
लातूर रेल्वे स्टेशनवर उभारण्यात आलेल्या रेल्वे वॅगनमधून पाणी उतरविण्यासाठी आणि साठविण्यासाठी बसविण्यात फिडरचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनवरील सर्व यंत्रणांची पाहणी केली.

Web Title: Now the distribution system of the plant should be strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.