आता बिबट्याच्या मातेचा शोध
By Admin | Updated: July 29, 2014 01:07 IST2014-07-29T00:34:30+5:302014-07-29T01:07:16+5:30
इटोली : जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरातील जंगलात रविवारी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सोमवारपासून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या मातेचा शोध सुरू केला आहे.
आता बिबट्याच्या मातेचा शोध
इटोली : जिंतूर तालुक्यातील इटोली परिसरातील जंगलात रविवारी बिबट्याला जेरबंद केल्यानंतर सोमवारपासून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या मातेचा शोध सुरू केला आहे. येथील जंगलात पिंजरा लावण्यात आला असून, बिबट्याही परत इटोलीत आणले आहे. सकाळपासूनच वनविभागाचे कर्मचारी बिबट्याच्या मातेचा शोध घेत आहेत.
इटोली व परिसर हा डोंगराळ आणि जंगल भाग आहे. या भागात बिबट्या असल्याचे मागील काही दिवसांपासून ग्रामस्थ सांगतात. वर्षभरापूर्वी निलज परिसरात मृतावस्थेतील बिबट्या आढळला होता. त्यानंतर २७ जुलै रोजी इटोली भागातील कलंदर भाई यांच्या शेतातील आखाड्यावर बिबट्यास वन विभागाने जेरबंद केले. त्यानंतर या बिबट्याला परभणी येथील वन संवर्धन कार्यालयात नेले होते. या भागात बिबट्या सापडल्यामुळे बिबट्याही येथेच वावरत असावा, असा अंदाज आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी बिबट्याची माता जंगलात असल्याची माहिती वन विभागाला दिली.
या माहितीवरुन वनपरिक्षेत्र अधिकारी एच.यु. वाळके हे २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता इटोलीत दाखल झाले. जंगलाच्या बाहेर येईल, या उद्देशाने रविवारी जेरबंद केलेला बिबट्याही त्यांनी सोबत आणला. बिबट्या आणि एक पिंजरा जंगल भागात लावण्यात आला असून, बिबट्याचा शोध घेतला जात आहे. वन विभागाचे बारा कर्मचारी बिबट्याचा शोध घेत आहेत. सायंकाळपर्यंत कर्मचाऱ्यांच्या हाती काहीही लागले नव्हते. परंतु हा पिंजरा रात्रभर या ठिकाणीच ठेवण्यात आला असून, बिबट्या आणि पिंजऱ्याच्या संरक्षणासाठी केहाळचे वनरक्षक जी.एल. घुगे आणि भोगावचे वनरक्षक सावंत यांना या ठिकाणी तैनात केले आहे.(वार्ताहर)