आता आमच्या येण्याचे दिवस आले आहेत़़़
By Admin | Updated: June 4, 2014 01:31 IST2014-06-04T01:03:08+5:302014-06-04T01:31:03+5:30
आशपाक पठाण, बीड जिल्ह्यात स्वत:च्या प्रचारात गुंतून पडलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनी लातूर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील महमदापूर पाटी येथे सभा घेतली़

आता आमच्या येण्याचे दिवस आले आहेत़़़
आशपाक पठाण, लातूर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड जिल्ह्यात स्वत:च्या प्रचारात गुंतून पडलेल्या गोपीनाथराव मुंडे यांनी लातूर मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील महमदापूर पाटी येथे सभा घेतली़ एरवी तजेलदारपणा दिसणार्या चेहर्यावर प्रचंड तणाव होता़ पांढरा पडलेला चेहरा पाहून कार्यकर्तेही भावूक झालेले होते़ भाषणाला उभे होताच त्यांनी थेट विषयाला हात घातला़ माझे मित्र विलासराव देशमुख आता आपल्यात नाहीत़ त्यामुळे लातूरच्या विकासासाठी साथ द्या़ काँग्रेस-राष्ट्रवादीचे जाण्याचे दिवस आले आहेत अन् आमचे येण्याचे दिवस आले आहेत, अशी भावनिक साद मुंडे यांनी घातली होती़ लातूर आणि गोपीनाथराव मुंडे यांचे नाते खूपच दृढ होते़ विधानसभा असो की लोकसभा़ मतदारांना त्यांच्या भाषणाची ओढ लागायची़ त्यामुळे विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांच्या सभेला श्रोत्यांची गर्दी कायम असायची़ महमदापूर पाटी येथे डॉ़ सुनील गायकवाड यांच्या प्रचारार्थ मुंडे यांची सभा होणार असल्याची चाहूल लागताच जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते तीव्र उन्हात त्यांची वाट बघत मंडपात बसले़ सभा मंडपाच्या बाजूलाच तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर त्यांच्या हेलिकॉप्टरचे आगमन होताच प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात व तोफा वाजवून त्यांचे स्वागत झाले़ मंचावर विराजमान होताच त्यांनी घाई सुरू केली़ भाजपा ग्रामीणचे नेते रमेश कराड यांचे भाषण सुरू असताना त्यांनी त्यांना आवरते घ्यायला सांगितले़ बीडची ओढ लागलेली आहे, घाई असतानाही त्यांनी तब्बल २० मिनिटे भाषण केले़ यात त्यांनी दिवंगत विलासराव देशमुख माझे मित्र होते़ आता ते आपल्यात राहिले नाहीत़ लातूरची अवस्था आता बिकट होत आहे़ लातूरचे मुंबई होत आहे, आपल्याला लातूरचे लातूरच ठेवायचे आहे, असे सांगत त्यांनी भाजपाला साथ देण्याची विनंती केली़ काँगे्रस-भाजपात लोकसभेची लढत असतानाही त्यांनी देशमुख कुटुंबियावर शब्दही उच्चारला नाही़ लोकसभा निवडणुकीत तर विजय नक्की असला तरी आता विधानसभेच्या कामाला लागा, असा आदेश त्यांनी या सभेत कार्यकर्त्यांना दिला़ चेहर्यावर प्रचंड तणाव दिसून येत होता़ त्यामुळे मुंडे साहेब काय बोलणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते़ मात्र, त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणातील मिश्किलपणा दाखवून दिला़ विरोधकांना कोपरखळी मारत टाळ्यांची दाद मिळविली़ सहकारी साखर कारखाने टिकले पाहिजेत, महागाई कमी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले होते़ पावसात छत्री नाकारली़़़ क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुनिल गायकवाडा यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांच्या सभेत गोपीनाथराव मुंडे भाषणास उभे होते़ पाऊस सुरू झाल्याने कार्यकर्त्याने छत्री लावली़ पण मुंडे साहेबांनी कार्यकर्ता भिजत असताना मी छत्री घेणार नाही, असे सांगितले़