आता बारापुल्ला गेटवर धडकला कंटेनर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:02 IST2021-08-21T04:02:27+5:302021-08-21T04:02:27+5:30
औरंगाबाद : मिलकॉर्नरकडून छावणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ऐतिहासिक बारापुल्ला गेटला शुक्रवारी दुपारी एका मोठ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात ...

आता बारापुल्ला गेटवर धडकला कंटेनर
औरंगाबाद : मिलकॉर्नरकडून छावणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ऐतिहासिक बारापुल्ला गेटला शुक्रवारी दुपारी एका मोठ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात दरवाजाचे काही दगड कोसळले. दरवाजातून मोठ्या वाहनांची ये-जा होऊ नये, या मुद्यावर महापालिका वाहतूक पोलिसांकडे अंगुलीनिर्देश करीत आहे. एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या प्रवृत्तीमुळे पानचक्कीजवळील महेमूद दरवाजा आज शेवटच्या घटिका मोजत आहे.
शहरातील ऐतिहासिक दरवाजांचा वारसा जतन करण्याचे दायित्व महापालिकेकडे आहे. स्मार्ट सिटीकडून २ कोटी रुपये खर्च करून ८ दरवाजांची डागडुजीही करण्यात येत आहे. महेमूद दरवाजाच्या डागडुजीसाठी जास्त खर्च येत असल्याने कंत्राटदारांनी निविदाच भरली नाही. दरम्यानच्या काळात दोन मोठ्या वाहनांनी दरवाजातून वाहन नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दरवाजाला धडक बसली. या दरवाजाचे छत कोसळण्याच्या मार्गावर आहे. या दरवाजाची आता जवळपास १ कोटी रुपये खर्च करून डागडुजी करावी लागणार आहे.
शुक्रवारी बारापुल्ला गेटला मोठ्या कंटेनरने धडक दिली. या अपघातात दरवाजाचा काही भाग कोसळला. परिसरातील तरुणांनी गर्दी केली. काही वेळ वाहतूकही खोळंबली. नंतर कंटेनर ज्या दिशेने आला त्या दिशेने निघूनही गेला. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेचे उपअभियंता काशीनाथ काटकर यांनी सांगितले की, कंटेनर धडकल्याचे समजले. दरवाजाजवळ गतिरोधक बसवावा, अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत. गतिरोधकामुळे मोठी वाहनांची वाहतूक थांबेल का? या प्रश्नावर काटकर यांनी हे काम वाहतूक पोलिसांचे असल्याचे सांगितले.
लोखंडी गर्डर आवश्यक
शाहनूरमियाँ दर्गा येथे गेटला वाहने धडक देत होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी गेटच्या दर्शनी भागात एक मोठा लोखंडी गर्डरच लावला. त्यामुळे मोठ्या वाहनांना ये-जा करता येत नव्हती.