आयुक्तालयासाठी आता रस्त्यावरची लढाई
By Admin | Updated: February 6, 2015 00:56 IST2015-02-06T00:48:15+5:302015-02-06T00:56:37+5:30
लातूर : आयुक्तालयासाठी लातुरात गुणवत्ता असून, २७ च्या वर विभागीय कार्यालये आहेत. अधिसूचनेच्या विरोधात लातूरकरांनी ७४९ हरकती नोंदविल्या असून

आयुक्तालयासाठी आता रस्त्यावरची लढाई
लातूर : आयुक्तालयासाठी लातुरात गुणवत्ता असून, २७ च्या वर विभागीय कार्यालये आहेत. अधिसूचनेच्या विरोधात लातूरकरांनी ७४९ हरकती नोंदविल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही ठराव केले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात रस्त्यावरची लढाई करण्यात येत असून, १० फेब्रुवारी रोजी गांधी चौकात महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या शिवछत्रपती ग्रंथालयात संघर्ष समितीची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव गोमारे होते. मंचावर अॅड. आण्णाराव पाटील, अॅड. व्यंकट बेद्रे, अशोक चिंचोले, बसवंतअप्पा उबाळे, रघुनाथ बनसोडे, संजय ओव्हळ, भारत सातपुते, कालिदास माने, अॅड. गणेश गोमसाळे आदींची उपस्थिती होती.
नांदेड जिल्ह्यातून केवळ ५० हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. त्यांनी एक लाख लोकांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. त्या हरकती नाहीत. लातूर जिल्ह्यातून मात्र ७४९ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींमध्ये उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, परळी, धारूर येथूनही हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींच्या माध्यमातून उस्मानाबाद व बीडने लातूरला समर्थन दिले आहे, अशी माहिती आयुक्तालय निर्माण संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. उदय गवारे यांनी दिली. (प्रतिनिधी)
हरकती व दावे दाखल करण्याची मुदत आता संपलेली आहे. अध्यादेशामध्ये आयुक्तालय सुरू करण्याचा जो मुद्दा आहे, त्याच्या विरोधात लातूरकरांची लढाई सुरू झाली आहे. हरकतींवर निर्णय घेण्यापूर्वीच २३ फेब्रुवारीपासून आयुक्तालय सुरू करण्याचा जो अध्यादेशात उल्लेख आहे, तो उल्लेख तात्काळ हटविण्यात यावा, यासाठी लातूर संघर्ष समितीने आंदोलनाला प्रारंभ केला आहे. या आंदोलनात सह्यांची मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे यावेळी अॅड. गोमारे यांनी सांगितले.