धान्यापाठोपाठ आता फळ भाजीपाला अडतही बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:10 IST2016-07-10T00:55:27+5:302016-07-10T01:10:41+5:30
औरंगाबाद : शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल करावी, या राज्य शासनाच्या आदेशाला विरोध करून धान्याच्या अडत व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला.

धान्यापाठोपाठ आता फळ भाजीपाला अडतही बेमुदत बंद
औरंगाबाद : शेतीमालावरील अडत खरेदीदारांकडून वसूल करावी, या राज्य शासनाच्या आदेशाला विरोध करून धान्याच्या अडत व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला. आता या आंदोलनात फळभाजीच्या अडत व्यापाऱ्यांनी उडी घेतली असून, उद्या रविवार १० जुलैपासून फळभाजीपाल्याचा अडत व्यवहार बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील धान्याचा अडत व्यवहार शनिवारी दिवसभर बंद होतो. एक, तीन, चार व पाच सेल हॉलचे कुलूप उघडण्यात आले नाही. त्यामुळे अडतच नव्हे तर किराणा व्यापारही ठप्प झाला होता. सकाळी चिकलठाणा, आडगाव व जडगाव येथील ३ शेतकऱ्यांनी २० क्विंटल गहू, ज्वारी व बाजरी विक्रीसाठी येथे आणली होती. अडत व्यापाऱ्यांनी धान्य उतरून घेतले, पण बंदमुळे हर्राशी झाली नाही. धान्य बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून ३ टक्के अडत घेतली जात होती व फळेभाजीपाला अडत व्यवहारात ६ टक्के अडत घेतली जात होती. अडत शेतकऱ्यांकडून नव्हे तर खरेदीदारांकडून घ्यावी, या अध्यादेशाची प्रत बाजार समितीकडून फळेभाजीपाला अडत व्यापाऱ्यांना आज प्राप्त झाली. यानंतर येथील फळभाजीपालाच्या अडत व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बैठक घेतली.
यावेळी राज्य सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध करण्यात आला. रविवारपासून बेमुदत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
व्यापाऱ्यांनी एक प्रत कृउबाच्या सचिवांना देण्यात आली. अडत शेतकऱ्यांकडून घ्यायची नाही आणि खरेदीदार अडत देण्यास तयार नाहीत, मग आम्ही अडत कोणाकडून घ्यायची, असा प्रश्न उपस्थित करून औरंगाबाद फळे व भाजीपाला अडत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष इसा खान यांनी सांगितले की, घोडेगाव, नगर, नाशिक येथील अडत बाजार बेमुदत बंद ठेवला आहे. आम्हीही रविवारपासून आमचे अडत व्यवहार बंद ठेवणार आहोत. अडत व्यापाऱ्यांच्या या बैठकीत अर्जुन येवले, शेख इम्रान, पूंजाराम सराटे, बाबू पैलवान, प्रभाकर पवार, इलियास शेठ यांच्यासह ६५ अडत व्यापारी सहभागी झाले होते.