आता ‘अबकड’ ऐवजी ‘एबीसीडी’
By Admin | Updated: July 20, 2014 00:36 IST2014-07-19T23:58:38+5:302014-07-20T00:36:27+5:30
विठ्ठल भिसे, पाथरी ग्रामीण भागात अंगणवाड्यातून बालकांना केवळ सकस आहारच दिला जात होता.
आता ‘अबकड’ ऐवजी ‘एबीसीडी’
विठ्ठल भिसे, पाथरी
ग्रामीण भागात अंगणवाड्यातून बालकांना केवळ सकस आहारच दिला जात होता. चिमूकल्यांना शिक्षण मात्र मिळत नसल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले अन् अंगणवाडीतील बालकांची संख्या कमी होऊ लागली. परंतु विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर अंगणवाड्या आयएसओ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आता आयएसओ झालेल्या अंगणवाड्यातून चिमूकली बालके अबकड ऐवजी एबीसीडीचे धडे गिरवू लागली आहेत. पाथरी तालुक्यात सहा अंगणवाड्या आयएसओ झाल्या असून आणखी १० अंगणवाड्यांची नोंदणी करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील पूर्वीपासून अंगणवाड्यांना इमारती नव्हत्या. अनेक ठिकाणी अंगणवाड्या झाडाखाली भरविल्या जात असत. त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना खाऊ दिला जात होता. त्यामुळे अंगणवाड्यामध्ये खाऊसाठीच बालकांना पाठविले जात होते. अंगणवाड्या म्हणजे कुपोषण मुक्तीचे केंद्र बनले होेते. आनंददायी शिक्षणाचा अभाव असल्याने अंगणवाडीतून पहिल्या वर्गात येणाऱ्यांना मराठी मूळाक्षरे ‘अ ब क ड’ वाचता येत नव्हते. यामुळे ग्रामीण भागात नर्सरीपासूनच्या खाजगी इंग्रजी शाळा सुरू झाल्या आणि अंगणवाडीतील बालकांची संख्या घटू लागली. विभागीय आयुक्तांच्या निर्णयानंतर अंगणवाड्या आयएसओ करण्याबाबतचा निर्णय झाला. लोकसहभागातून अंगणवाड्यांना मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांचा सहभागही वाढला. तालुक्यात सहा अंगणवाड्या आयएसओ झाल्या आहेत. या अंगणवाड्यांचे आॅडीट झाल्यानंतर अंगणवाड्यातील कार्यकर्त्यांना यासाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. आयएसओ झालेल्या अंगणवाडीतील बालके ए बी सी डीचे बोल बोलू लागले आहेत.
१९ अंगणवाड्या प्रस्तावित
मुलभूत सोयीसुविधा लोकसहभागातून उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील पंधरा अंगणवाड्यामध्ये लोकसहभागाचे काम सुरू करण्यात आले आहे. गावात जावून ग्रामस्थांशी चर्चा करून घरोघरी फिरून अंगणवाडी पर्यवेक्षिका काम करीत आहेत. यामध्ये लोणी, गुंज, कान्सूर, सुरताबाई तांडा, निवळी, पाटोदा, वडी, खेडूळा, झरी, देवनांदरा, बांदरवाडा, मरडसगाव, बानेगाव, जवळा झुटा, नाथरा, तुरा या गावांचा समावेश आहे. प्रकल्प अधिकारी जितेंद्र देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी पर्यवेक्षिका, आर.एस. पठाण, जे.पी. राजूरकर, एम.बी. गायकवाड, व्ही.एम. कुलकर्णी यांनी बैठका घेऊन हा कार्यक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे.
सजावटीने रंगल्या अंगणवाड्या
अंगणवाड्यांना आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी या सहाही अंगणवाड्यामध्ये रंगरंगोटी, आॅईलपेंट, बोलके चित्र, बालकांसाठी टेबल, खिडक्यांना पडदे, वॉटर फिल्टर, कचराकुंड्या, झोपाळा, कंपाऊंडवॉल, घसरगुंडी, संगणक आणि विद्यार्थ्यांना एकच ड्रेसकोड देण्यात आल्यामुळे या अंगणवाड्या नटलेल्या दिसून येत आहेत.
सहा अंगणवाड्या आयएसओ
पहिल्या टप्यामध्ये पाथरी तालुक्यातील सहा अंगणवाड्यांचे आयएसओसाठी २५०० रुपये भरून नामांकन करण्यात आल्यानंतर पारजात कंनस्लटंसी औरंगाबाद संस्थेच्या वतीने एप्रिल महिन्यामध्ये आॅडीट करण्यात आले. यामध्ये बाबूलतार अंगणवाडी क्र. २, पाथरगव्हाण अंगणवाडी क्रमांक १ आणि २, रेणाखळी, हादगाव क्र. १, विटा क्रमांक २ या अंगणवाड्यांचा समावेश आहे.