जालना शहरातील धार्मिक स्थळांना पालिकेने बजावल्या नोटिसा
By Admin | Updated: September 6, 2015 23:53 IST2015-09-06T23:41:58+5:302015-09-06T23:53:35+5:30
जालना : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा शोध घेण्यासाठी नगर पालिकेने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या आहेत. सदर नोटिसा बजावून धार्मिक स्थळांच्या

जालना शहरातील धार्मिक स्थळांना पालिकेने बजावल्या नोटिसा
जालना : शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा शोध घेण्यासाठी नगर पालिकेने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावल्या आहेत. सदर नोटिसा बजावून धार्मिक स्थळांच्या संबंधितांना कागदपत्र सादर करण्याचे आवाहनही केले आहे.
शहरात विविध धर्मांची तसेच सुमदायांची धार्मिक स्थळे आहेत. यातील काही स्थळे भर रस्त्यावर अथवा अतिक्रमण करुन केलेले आहेत. यामुळे अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अनेक घटनाही घडल्या आहेत. २९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिकस्थळांच्या आढाव्याबाबत बैठक घेण्यात आली.
यात नगर पालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचा शोध घेण्यासाठी धर्मादाय आयुक्त नोंदणी प्रमाणपत्र परवानगी, मालकी हक्काचे पुरावे, जागा मालकाचे संमतीपत्र किंवा स्वत:च्या मालकीच्या असल्यास सातबारा किंवा मालमत्ता पत्रक व इतर कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परंतु शहरातील अनेक धार्मिक स्थळांकडे कोणतीच कागदपत्रे नसल्याचे चित्र आहे.
प्रभागातील स्वच्छता निरीक्षकांमार्फत मशीद, मंदिर, गुरुद्वारा, चर्च व इतर धार्मिक स्थळांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. किती नोटिसा बजावण्यात आल्या याबाबत पालिकेकडे अद्याप माहिती संकलित झाली नसल्याचे नगररचना विभागाचे देशमुख यांनी सांगितले. शहरात विविध जाती धर्मांची एकूण ४६७ प्रार्थनास्थळे आहेत.
प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी अधिक आहे. ज्या धार्मिक स्थळांपासून वाहतूक अथवा इतर मूलभूत सुविधांसाठी त्रास होत नाही, अशी धार्मिक स्थळे अधिकृत होऊ शकतात, असेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शासनाच्या एक सर्वेक्षणाचा भाग म्हणून या नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान नगर पालिकेच्या वतीने धार्मिक स्थळांच्या प्रतिनिधींनाही आवाहन करण्यात आले आहे. पालिकेने दिलेले कागदत्रांची पूर्तता करावी, जेणे करुन पालिकेस स्थळांची नोंद करण्यास सुलभ होणार असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)