रस्त्यावर घरे बांधणाऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: April 30, 2015 00:37 IST2015-04-30T00:27:57+5:302015-04-30T00:37:20+5:30
लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़

रस्त्यावर घरे बांधणाऱ्यांना नोटिसा
लातूर : उद्योग भवन व सिग्नल कॅम्प परिसरातील ग्रीन बेल्टच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर १६ हजार फुट जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करुन पक्के घरे बांधली आहेत़ या रस्त्यावर बांधण्यात आलेले घर अथवा कच्चे अतिक्रमण १५ दिवसात काढण्यात यावेत, अशा नोटिसा १० अतिक्रमण धारकांना मनपा आयुक्तांनी पाठविल्या आहेत़ नोटिसा पाठविलेल्या व्यक्ती शहरातील बड्या हस्ती आहेत. यामुळे खळबळ उडाली असून, सिग्नल कॅम्पला हादरा बसला आहे.
लातूर इंडस्ट्रीयल स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमण करुन काही लोकांनी रस्ता बंद केला आहे़ या रस्त्यावर काहींनी पक्के घरे बांधली आहेत़ काही लोकांनी शिकवणी वर्गाला ही जागा बांधकाम करुन भाड्याने दिली आहे़ गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेच्या या रस्त्यावर त्यांचे अतिक्रमण आहे़ यासंदर्भात २२ आॅक्टोबर २०१३ रोजी मनपा आयुक्तांकडे मल्लिकार्जून भाईकट्टी यांनी तक्रार केली़
या तक्रारीची दखल घेत मनपा आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत अतिक्रमण केलेल्या १० लोकांना २७ एप्रिल २०१५ रोजी नोटिसा पाठविल्या आहेत़ मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर पक्के /कच्चे बांधकाम त्वरीत काढावे़ अथवा १५ दिवसानंतर अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल. स्वत:हून अतिक्रमण न काढल्यास अतिक्रमण विभागाकडून ते काढण्यात येईल़ त्यावर झालेला खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल करण्यात येईल, असेही या नोटीसीत म्हटले आहे़ (प्रतिनिधी)
केनिया मुकुंदराव कवरजी (आर८/४७), केनिया मुकुंदराव कवरजी (आर ८/४६), केनिया कस्तुर बेन (आर ८/४८), सुंदर बेन शांतीलाल शहा (आर ८/४९), प्रेमादेवी रमेशचंद्र भुतडा (आर ८/६९), रामेश्वर रामकिशन भराडिया (आर ८/७१), रमेशचंद्र नारायणदास भुतडा (आर ८/७०), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७३), मे़बसवेश्वर रीड इंडस्ट्रीज (आर ८/७२), स्रेहा असोसियशन (आर ८/७४), इंडस्ट्रील स्टेट सिग्नल कॅम्प, लातूर या दहा जणांना मनपाने नोटिसा बजावल्या आहेत़
इंडस्ट्रील स्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटी लि़ मधील मंजूर रेखांकनामधील रस्त्यावर अतिक्रमणधारकांनी काही ठिकाणी पक्के तर काही ठिकाणी कच्चे बांधकाम केले आहे़ या अतिक्रमण धारकांना तक्रारीनुसार नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत़ तसेच त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे़ त्यांचे म्हणणे असमाधानकारक असेल, तर अतिक्रमण काढण्यात येईल़ परंतु त्यांना म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे, असे महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लोकमतशी बोलताना सांगितले़