विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटीस; आता संपूर्ण प्रक्रियाच होणार ऑनलाइन
By राम शिनगारे | Updated: November 8, 2025 16:45 IST2025-11-08T16:41:58+5:302025-11-08T16:45:07+5:30
विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईमुळे संशोधक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी शोधप्रबंध सादर केल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात असल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते.

विद्यापीठाच्या पीएच.डी. विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना नोटीस; आता संपूर्ण प्रक्रियाच होणार ऑनलाइन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने पीएच.डी. विभागातील दिरंगाईची झाडाझडती घेतली आहे. त्याशिवाय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली असून या विभागातील मनुष्यबळाची कमतरता लवकरच दूर करण्यात येईल. शिवाय, या विभागाची संपूर्ण प्रक्रियाच ऑनलाइन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे यांनी ‘लोकमत’ला दिली.
विद्यापीठातील पीएच.डी. विभागातील दिरंगाईमुळे संशोधक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी शोधप्रबंध सादर केल्यानंतर त्यावर पुढील प्रक्रिया होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी जात असल्याकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्याविषयी बोलताना प्रकुलगुरू डॉ. सरवदे म्हणाले, मनुष्यबळाची कमतरता, मूल्यांकनासाठी पाठविलेल्या परीक्षकांकडून उशिरा मिळणाऱ्या प्रतिसादामुळे काही शोधप्रबंध थांबलेले होते. त्याविषयी नियमित आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेत बैठकही झाली असून, संपूर्ण पीएच.डी. विभागच ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच त्या विभागात आवश्यक असलेले मनुष्यबळही उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. संबंधितांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर विभागातील अनेकांच्या दुसरीकडे बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही डॉ. सरवदे यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ विद्यार्थ्याचा एक अहवाल नकारात्मक
३३ महिन्यांपासून पीएच.डी.च्या विद्यार्थ्याचा व्हायवा झालेला नसल्याचे समोर आले होते. याविषयी कुलगुरूंनी संपूर्ण माहिती काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी पाठविलेले शोधप्रबंधापैकी एका परीक्षकाने त्रुटी काढलेली आहे. त्या त्रुटीची पूर्तता संबंधित संशोधकासह मार्गदर्शकाने केल्यास व्हायवा घेण्यात येईल, अशी माहिती विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी कळविले आहे.
आंदोलनाचा मार्ग स्वीकारु
पीएच.डी. विभागातील दिरंगाई, गैरप्रकाराच्या विरोधात मागील अनेक महिन्यांपासून आवाज उठवत आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही अनेक वेळा हा प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार दोन समित्यांचीही स्थापना केली आहे. यानंतरही कारभार सुधारला नाही, तर यापुढे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.
-डॉ. योगिता होके पाटील, सदस्य, व्यवस्थापन परिषद, विद्यापीठ