...त्या ठेकेदारांना नोटीस
By Admin | Updated: July 17, 2016 00:30 IST2016-07-17T00:30:12+5:302016-07-17T00:30:12+5:30
खराब रस्ते प्रकरण : कोटीचे नुकसान, रस्ते नव्याने करून घेणार : सरनोबत

...त्या ठेकेदारांना नोटीस
कोल्हापूर : गतवर्षी शहरात दहा लाख रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले जे रस्ते खराब झाले आहेत, त्या सर्व ठेकेदारांना महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. खराब झालेले रस्ते संबंधित ठेकेदारांनी दुरूस्त करून द्यावेत अन्यथा त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशाराच या नोटीसद्वारे दिला जाणार आहे.
शुक्रवारी महापौर अश्विनी रामाणे यांनी गतवर्षी केलेले रस्ते खराब झाल्यामुळे चारही विभागीय कार्यालयाची बैठक बोलावून खराब रस्त्यांना जबाबदार असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेले दोन दिवस सर्व अधिकारी रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात गुंतले आहेत. दोन दिवसांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून तयार केलेले ५९ रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. या सर्व रस्त्यांवर सुमारे चौदा कोटी रुपये खर्च झाले आहेत. सुमारे ऐंशी टक्के रस्ते खराब झाले आहेत. पावसामुळे एक कोटीचे आर्थिक नुकसान झाल्याचे शनिवारी सांगण्यात आले.
पावसामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत रस्त्याच्या बाजूपट्टीचे सीलकोट खराब झाल्याचे, रस्त्याचा वरचा थर निघाल्याचे, रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याचे आढळून आले आहे. ज्यांनी रस्ते केले आहेत, त्या सर्व ठेकेदारांना सोमवारी नोटीस देऊन खराब झालेले रस्ते दुरुस्त करून द्या, म्हणून बजावले जाणार आहे. तथापि, ही कामे पावसाळा संपल्यावर करण्यात येतील, तोपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अशा सूचना दिल्या जातील, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. एक अनुभव आल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने कामे देतानाच्या अटी व शर्थी यांच्यामध्ये काही सुधारणा करण्याचे ठरविले असल्याचेही सरनोबत यांनी सांगितले.
खराब रस्त्यांचे ठेकेदार
अनिल पाटील, बबन पोवार, उत्तम पाटील, महेश भोसले, अमित साळोखे, अनंत कन्ट्रक्शनचे दिलीप काजवे, संगीता कन्ट्रक्शनचे गणेश खाडे, शिवपार्वती कन्स्ट्रक्शनचे कुकरेजा.