तुळजा भवानी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस
By Admin | Updated: July 18, 2014 01:49 IST2014-07-18T00:34:54+5:302014-07-18T01:49:34+5:30
अमित सोमवंशी , उस्मानाबाद तुळजापूर येथे चालू असलेल्या श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील दुरवस्था ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशनद्वारे उघड

तुळजा भवानी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीस
अमित सोमवंशी , उस्मानाबाद
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानअंतर्गत तुळजापूर येथे चालू असलेल्या श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील दुरवस्था ‘लोकमत’ने गुरूवारी स्टींग आॅपरेशनद्वारे उघड केल्यानंतर या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली. मंदिर संस्थानचे तहसीलदार सुजीत नरहरे यांनी तातडीने वसतिगृहाची पाहणी केली. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
तुळजापूर येथील श्री तुळजा भवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहास ‘लोकमत’ टीमने बुधवारी भेट दिली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. वसतिगृहातील खोल्यांची दुरवस्था, बहुतांश खोल्यांमधील लाईट फिटींगची दुरवस्था आदी बाबींबरोबरच वसतिगृहाच्या एका खोलीमध्ये दारुच्या बाटल्याही आढळून आल्या होत्या. याबाबत प्राचार्यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीत वसतिगृहाच्या साफसफाईबाबत विचारणा करण्यात आली असून, वसतिगृहात दारुच्या बाटल्या आढळून आल्याने महाविद्यालयाची मोठी बदनामी झाली आहे. त्यामुळे याबाबत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करुन त्याचा अहवाल पाठविण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, वसतिगृह बंद असताना तेथे दारूच्या बाटल्या कशा आल्या, याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे तहसीलदार नरहरे यांनी सांगितले. दरम्यान,
गुरूवारी वृत्त प्रसिध्द होताच अभियांत्रिकीच्या अनेक विद्यार्थ्यांनी दूरध्वनी करून ‘लोकमत’चे कौतुक केले.
वसतिगृहाची लवकरच दुरूस्ती - देशमाने
श्री तुळजा भवानी मंदिर संस्थानने महाविद्यालयासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. या रकमेतून वसतिगृहाची दुरूस्ती, नवीन खिडक्या-दरवाजे यासह फरशी बसविण्यात येणार असल्याचे व याबाबतच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी सांगितले. वसतिगृहातील विद्यार्थी सुटीसाठी गावी गेल्याने वसतिगृहाची स्वच्छता सुरू आहे. त्यामुळे या खोल्यांतील कॉट, गाद्या व इतर साहित्य एकत्रितपणे एका खोलीत ठेवून त्या दुरूस्तीसाठी पाठविण्यात येणार होत्या.तसेच विद्यार्थी नसल्याने प्रत्येक खोलीची स्वच्छता करण्यात येत असून, टीव्ही संच बंद असल्याने त्याच्या केबलचे वायर उघडे होते, असेही देशमाने यांनी म्हटले आहे. महाविद्यालयाच्या मागणीनुसार संस्थानकडून विविध उपक्रम, दुरूस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो, असा खुलासाही त्यांनी पत्रकान्वये केला आहे.